महापालिका व सरकारमध्ये अमृत योजनेवरून शीतयुध्द

0
99

अमृत योजनेवरून पणजी महापालिका व सरकार यांच्यात शीतयुध्द सुरू असून केंद्रीय नगरविकास मंत्रालयातील अमृत योजनेच्या प्रमुखांना एक पत्र लिहून पणजी शहराला अमृत योजनेखाली मंजूर झालेला निधी न देण्याची सूचना आपण करणार असल्याचे पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

यासंबंधी अधिक माहिती देताना ते म्हणाले, की गोवा सरकार व नगरपालिका प्रशासनाने अमृत योजनेविषयी पणजी महापालिकेला पूर्णपणे अंधारात ठेवले. तसेच पणजी महापालिका मंडळ व स्थायी समितीला त्यासंबंधीचा कोणताही ठराव घेऊ न देता अमृत प्रकल्प मंजूर करून घेतला. हे करताना महापालिकेच्या हक्कांवर गदाच आणली गेली असल्याचे महापौर म्हणाले.
निधी मंजूर करण्यात आल्यास पणजी महापालिका क्षेत्रात कोणतेही काम करू देणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. महापालिका क्षेत्रातील महत्त्वाचे निर्णय सरकारने घ्यायचे आणि आम्ही फक्त गटारे साफ करण्याचे काम करायचे काय, असा सवालही फुर्तादो यांनी यावेळी केला.

कला अकादमीची लाखोंची घरपट्टी

दरम्यान, कला अकादमी सुरू झाल्यापासून आतापर्यंत कला अकादमीची घरपट्टी भरण्यात आलेली नसून ती लाखोंच्या घरात असल्याचे फुर्तादो म्हणाले. आम्ही कला अकादमीला सगळी सेवा देतो. पण त्यांनी घरपट्टीचा एकही पैसा भरला नसल्याचे ते म्हणाले. सरकारी गाळ्यांत राहणारे सरकारी कर्मचारी घरपट्टी व कचरा उचलसाठीचे पैसे भरत नसल्याने त्यांचा कचरा उचलण्यात येणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.