पाटो-पणजी येथे मनोरंजन विभाग उभारण्याची पणजी महापालिकेची योजना आहे, अशी माहिती काल पणजीचे महापौर रोहित मोन्सेर्रात यांनी दिली. तेथे जास्त गाजावाजा नसलेले असे मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले जातील व त्यासाठी स्थानिक कलाकारांना प्राधान्य देण्यात येईल, असे मोन्सेरात यांनी यावेळी स्पष्ट केले.
या मनोरंजन विभागात छोटी दुकाने रेस्टॉरंट्स, स्ट्रीट फूड आदीची सोय असेल, असेही मोन्सेरात यांनी सांगितले. विक्री समितीच्या बैठकीला हजर राहिल्यानंतर बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. रस्त्यांवर वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी शहरात ठिकठिकाणी गाडे उभारण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली. शहरात यापूर्वी असे 92 गाडेवाले होते आणि कित्येक वर्षे गाडेवाले म्हणून व्यापार केल्यानंतर त्यांना रस्त्यांवरून हलवल्याने ते विस्थापित झाल्याचे मोन्सेरात म्हणाले. या लोकांना पुन्हा गाडे उभारण्यास परवानगी दिली जाईल. महापालिकेची कुठे कुठे अशा प्रकारचे गाडे उभारण्याची योजना आहे त्याविषयीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. या गाड्यांची रचना कशी असावी, त्याची माहिती गाडेवाल्यांना देण्यात येईल आणि त्यानुसार त्यांना आपल्या गाड्यांची रचना करावी लागेल, असेही महापौरांनी स्पष्ट केले.
मिरामार येथील पदपूल हटवणार
दरम्यान, मिरामार येथे शारदा मंदिराजवळ असलेला धोकादायक पदपूल हटवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या पदपुलाचे सुरक्षा ऑडिट करण्याची जबाबदारी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयावर सोपवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.