महान राजनीतिज्ञाचा अस्त ः राष्ट्रपती
भारताने अटलजींच्या जाण्याने एक महान राजनीतीज्ञ गमावला आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली आहे. वाजपेयींचे नेतृत्व, दूरदृष्टी, परिपक्वता, वक्तृत्वशैली या सर्व गोष्टी अलौकिक होत्या. असे त्यांनी नमूद केले आहे.
महान पर्वाचा अस्त ः पंतप्रधान
अटलबिहारी वाजपेयी कालवश झाल्याने एका महान पर्वाचा अस्त झाला आहे. एक मोठी पोकळी त्यांच्या जाण्यामुळे निर्माण झाली आहे. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या असंख्य आठवणी आपल्या मनात दाटून आहेत. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी अटलजी मोठे स्फूर्तीस्थान होते असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
भारतमातेचे रत्न हरपले ः उपराष्ट्रपती
अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने भारतमातेचे एक रत्न हरपले आहे अशी प्रतिक्रिया उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली. वाजपेयी अनेक दशकांपासून भारत मातेच्या गळ्यातील एक हिरा बनून राहिले होते. असे ते म्हणाले.
भारतमातेने सुपुत्र गमावला ः राहुल
भारतमातेने आपला सुपुत्र गमावला अशा शब्दात कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. वाजपेयी यांचे निधन ही अत्यंत दुःखद घटना आहे. भारतीय जनतेने त्यांच्यावर खूप प्रेम केले व त्यांच्या आदरही केला असे गांधी म्हणाले.
वाजपेयी महान पंतप्रधान ः मनमोहन
अटलबिहरी वाजपेयी हे एक महान पंतप्रधान तसेच एक श्रेष्ठ संसदपटू होते अशी प्रतिक्रिया माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली. उत्तम वक्ता, प्रभावी कवी आणि अलौकिक लोकसेवक अशा शब्दात सिंग यांनी वाजपेयींना आदरांजली वाहिली.
सर्वांत जवळचा मित्र हरपला ः अडवाणी
‘वाजपेर्यींबद्दल बोलण्यास माझ्याजवळ शब्दच नाहीत. गेल्या ६५ वर्षांपासूनचा सर्वांत जवळचा मित्र मी गमावला आहे. त्यांच्या हाताखाली सहकारी म्हणून काम करण्याचे भाग्य मला लाभले’ असे भावपूर्ण उद्गार खासदार तथा माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी काढले.