महागठबंधनासाठी कॉंग्रेसने पुढाकार घ्यावा ः राष्ट्रवादी

0
93

जनतेची दिशाभूल करून सत्ता भोगणार्‍या भाजपचा येत्या २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी महागठबंधन अत्यंत आवश्यक आहे. बिहारचा ‘फॉर्मुला’ वापरला तरच भाजपचा पराभव होऊ शकेल. त्यासाठी कॉंग्रेस हा मोठा भाऊ असल्याने महागठबंधनासाठी त्याने पुढाकार घ्यावा अशी मागणी प्रदेश राष्ट्रवादीचे ज्येष्ठ उपाध्यक्ष जुझे ङ्गिलीप डिसोझा यांनी काल पत्रकार परिषदेत केली.

राज्यातील सर्व समविचारी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन डिसौझा यांनी केले आहे. मगो पक्षालाही महायुतीत दरवाजे खुले केले पाहिजे, असे सांगून महायुती व्हावी म्हणून आपण पूर्वीपासूनच प्रयत्नशील आहोत. गेल्या काही दिवसांत आपण अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्याचे त्यांनी सांगितले. चाळीस मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढविण्याची भाषा बोलणारे गोव्याच्या हिताचा विचार करीत नाहीत. महायुती व्हावी ही जनतेची भावना आहे. त्या भावनेचा राजकीय पक्षांनी आदर केलाच पाहिजे, असे त्यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील मतदारांचा तपशील गोळा करण्यासाठीच भाजप सरकारने एलईडी बल्ब वितरित करण्याचे नाटक चालविले आहे. जनतेने त्यास बळी पडू नये असे आवाहन डिसोझा यांनी केले. विजेच्या बिलात सवलत दिली असती तर त्याचे स्वागत झाले असते, असे ते म्हणाले.