महाकुंभ चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्यांची अधिकृत आकडेवारी घटनेच्या सुमारे 20 तासांनंतर प्रशासनाने काल जाहीर केली. या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. यापैकी 25 जणांची ओळख पटली आहे. याशिवाय 60 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना प्रयागराजमधील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्वांवर सरकारी खर्चाने उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.
मौनी अमावस्येला पवित्र स्नानासाठी मोठ्या संख्येने भाविक जमल्यानंतर त्रिवेणी संगमावर ही चेंगराचेंगरीची घटना घडली. मंगळवार-बुधवारी रात्री दोनच्या सुमारास महाकुंभात चेंगराचेंगरी झाली. यावेळी अनेक भाविक चेंगराचेंगरीत सापडले.
अमृतस्नान करण्यासाठी रात्री दोन वाजता त्रिवेणी संगमावर बहुतांश भाविक जमले होते. काही भाविक जिथे झोपले होते त्यापुढील बॅरिकेडिंग तोडून काही भाविक संगमाच्या दिशेने धावत गेले. त्यामुळे झोपलेल्या भाविकांना उठण्याचीही संधी मिळाली नाही. सर्वजण त्यांना चिरडत गेले, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
कुंभनगरचे उपमहानिरीक्षक वैभव कृष्णन यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रचंड गर्दीमुळे बॅरिकेड तुटले. त्यामुळे चेंगराचेंगरीत लोकांचा मृत्यू झाला आहे. रात्री दीडच्या सुमारास आखाडा मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे बॅरिकेडिंग तोडून आत घुसलेल्या जमावाने आंघोळीसाठी थांबलेल्या लोकांना चिरडण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आणि जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. महाकुंभ मेळ्यादरम्यान त्रिवेणी संगमावर झालेल्या चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू झाला तर 60 जण जखमी झाले आहेत. या घटनेत अनेकांनी आपल्या कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती गमावल्या आहेत.