मळा पणजी येथील गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेला मळा मार्केटचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे, अशी माहिती पणजीचे आमदार तथा ग्रेटर पणजी पीडीएचे अध्यक्ष बाबूश मोन्सेरात यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
ग्रेटर पणजी पीडीएच्या अध्यक्षपदाचा ताबा स्वीकारल्यानंतर आमदार मोन्सेरात बोलत होते. मळा येथे मार्केटचा प्रश्न गेली कित्येक वर्षे वादामुळे प्रलंबित असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढला जाणार आहे. जलस्रोत खात्याच्या माध्यमातून मळा येथील तळ्याचा विकास केला जाणार आहे. मळा येथे मार्केट आणि तळ्याच्या विकासाचा प्रश्न प्रलंबित असल्याने पावसाळ्यत पाणी साचून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, असेही आमदार मोन्सेरात यांनी सांगितले.
शहरात नव्याने उभारण्यात येणार्या इमारतींमध्ये वाहन पार्किंगसाठी योग्य जागा राखून ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. पणजीमध्ये वाहन पार्किंगसाठी आवश्यक जागा उपलब्ध नसल्याने पार्किंग समस्येला तोंड द्यावे लागत आहे, असेही आमदार मोन्सेरात यांनी सांगितले.
पणजी शहरातील सर्व रस्त्यांच्या डांबरीकरणावर भर दिला जाणार आहे. शहरातील सात ते आठ रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे मार्गी लागली असून पुढील महिन्यात डांबरीकरणाची कामे हाती घेतली जाणार आहेत. शहरातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यापूर्वी रस्ते खोदकाम करण्याची सूचना संबंधितांना करण्यात आली आहे. रस्त्याच्या डांबरीकरणानंतर खोदकाम करण्यास मान्यता दिली जाणार नाही, असेही आमदार मोन्सेरात यांनी सांगितले.
पणजी ही राज्याची राजधानी असल्याने सर्व रस्त्याचे डांबरीकरण झाले पाहिजे. रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामात निधीची समस्या निर्माण झालेली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बैठक घेऊन रस्त्याच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी केली जाणार आहे, असेही आमदार मोन्सेरात यांनी सांगितले.