मळा पुलामुळे वाहतूक कोंडी समस्या सुटणार

0
131

>> मुख्यमंत्री पर्रीकरांचा दावा

रूआ द ओरेम खाडीवरील मळा ते पाटो या पुलामुळे मळा परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल या पुलाच्या उद्घाटन समारंभावेळी केले.

यावेळी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार दीपक पाऊसकर, महामंडळाचे उपाध्यक्ष सिध्दार्थ कुंकळ्येकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
या पुलाच्या दुसर्‍या टप्प्याचे बांधकाम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. पुलाच्या बांधकामात अडथळा निर्माण करणार्‍या पाण्याच्या मुख्य जलवाहिनीचे स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दिली. रूआ द ओरम खाडीवर उभारण्यात आलेला हा तिसरा पूल आहे.

या पुलाच्या दोन्ही टप्प्यातील बांधकामावर २४.२४ कोटी रूपये खर्च होणार आहेत. पुलाच्या पहिल्या टप्प्यात ८.५ कोटी रूपये खर्चून लेन १ चे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. या पूलामुळे मळा परिसरातीत वाहतुकीत सूसूत्रता येण्यास मदत होणार आहे. जुन्या पाटो पुलावरील वाहतुकीचा भार कमी होणार आहे. मळा, भाटले, ताळगाव या भागातील नागरिक या पुलावरून थेट राष्ट्रीय महामार्गावर जाऊ शकतात. नवीन पूलामुळे वाहन चालकांचा वेळ व इंधन वाचण्यास मदत होणार आहे.