मर्सिडीजचालकास 2 दिवसांची पोलीस कोठडी

0
36

>> वैद्यकीय तपासणीत मद्य प्राशन केल्याचे स्पष्ट; संशयित परेश सावर्डेकर याची जामिनासाठी धावाधाव; अर्ज दाखल

म्हार्दोळ पोलिसांनी बाणस्तारी अपघात प्रकरणी मर्सिडीज कारचा चालक परेश ऊर्फ श्रीपाद सिनाय सावर्डेकर याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर काल पहाटेच्या सुमारास त्याला अटक केली. त्यानंतर त्याला फोंडा प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले असता, 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. परेश सावर्डेकर याने जामिनासाठी उत्तर गोवा जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असून, त्यावर मंगळवारी (दि. 8) सुनावणी होणार आहे. या अपघात प्रकरणी अटक केलेल्या सावर्डेकरची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्याच्या रक्तात मद्याचे प्रमाण अधिक आढळून आले. दरम्यान, अपघातात मृत पावलेल्या तिघांचे मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत.

बाणस्तारी येथील पुलावर रविवारी रात्री 8 च्या सुमारास हा अपघात घडला होता. त्यात पुलावर ओव्हरटेक करण्यास मनाई असतानाही भरधाव मर्सिडीज कारचालकाने एका ट्रकला ओव्हरटेकचा प्रयत्न केला. परिणामी मर्सिडीज कारची धडक पाच वाहनांना बसली. त्यात 3 जण जागीच ठार, तीन जण गंभीर जखमी झाले होते. या अपघातात मृत पावलेल्यांमध्ये एका दांपत्यासह एका युवकाचा समावेश होता, तर गंभीर जखमींवर बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार सुरू आहेत.

योग्य तपासाची सूचना
पोलिसांना करणार : गुदिन्हो

बाणस्तारी भीषण अपघात प्रकरणी पोलीस तपासाबाबत उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. बाणस्तारी अपघात प्रकरणी अपघातास कारणीभूत वाहनचालकावर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणी पोलिसांना योग्य तपास करण्याची विनंती केली जाणार आहे, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

पोलीस दबावाला बळी पडले : गुदिन्हो
पोलिसांनी बाणस्तारी येथील अपघात प्रकरणात मर्सिडीज कारच्या चालकाला अटक केली आहे; मात्र अपघाताच्या वेळी दुसरीच व्यक्ती कार चालवत होती आणि पोलिसांनी भलत्याच व्यक्तीला अटक केली आहे, असा आरोप होत आहे. बाणस्तारी येथील अपघाताच्या वेळी मर्सिडीज कार कोण चालवत होते, हे अनेकांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. या पार्श्वभूमीवर बाणस्तारी अपघात प्रकरणी पोलिसांना योग्य तपास करण्याची विनंती केली जाणार आहे. या अपघात प्रकरणामध्ये काही ‘पॉवरफूल’ व्यक्तींनी हस्तक्षेप करून पोलिसांवर दबाव आणल्याने ते दबावाला बळी पडल्याचा संशय वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना काल व्यक्त केला.

वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले…
ख् मद्यधुंद कारचालक बॉम्ब : मद्यप्राशन, भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्या कायद्यानुसार कडक कारवाई केली जाणार आहे. मद्याच्या नशेत वाहन चालविणारे रस्त्यावरील बॉम्ब आहेत. मद्याच्या नशेत वाहन चालवल्याने होणाऱ्या अपघातातील मृत्यू हा खूनच आहे.
ख् नुकसानभरपाई वसुलीचा विचार : मद्याच्या नशेत भरधाव वेगाने वाहने चालवून निष्पाप व्यक्तींचा बळी घेणाऱ्यांकडून नुकसानभरपाई वसूल करण्यावर विचारविनिमय केला जाणार आहे. निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडतात.
ख् ‘ती’ रक्कम मृतांच्या नातेवाईकांना : अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी अपघातास कारणीभूत ठरणाऱ्यांकडून रक्कम वसूल करून ती मृतांच्या नातेवाईकांना देण्याबाबत कायदेशीर तरतूद करण्याची गरज आहे. राज्य रस्ता सुरक्षा मंडळाची बैठक घेऊन या विषयावर चर्चा करणार आहे.

लोकांनीही जबाबदारीचे भान ठेवावे : मुख्यमंत्री
पणजी (न. प्र.) राज्यात काही लोक मद्यधुंद स्थितीत वाहन चालवत असतात ही गोष्ट खरी असली तरी त्यासाठी आम्ही रस्त्यावरून धावणारे प्रत्येक वाहन अडवू शकत नाही. तसे करण्याचा प्रयत्न केला, तर सरकारला जनक्षेोभाला सामोरे जावे लागेल. सरकार मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई सुरू करण्यास तयार आहे; पण लोकांनीही आपल्या जबाबदारीचे भान ठेवायला हवे, असे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले. बाणस्तारी अपघाताच्या पार्श्वभूमीवर काल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी शून्य तासाला हा प्रश्न उपस्थित केला होता.

मर्सिडीज कारमालकाला यापूर्वी दंडाची 7 चलन; एकही भरले नाही
बाणस्तारी येथील भीषण अपघातास जी मर्सिडीझ कार कारणीभूत ठरली होती, त्या कारच्या मालकाला (क्र. जीए 07 के 7311) भरधाव वाहन चालविल्याप्रकरणी यापूर्वी 7 चलन जारी करण्यात आली आहेत; मात्र एकाही दंडाच्या चलनाच्या रकमेचा भरणा कारमालकाने केलेला नाही, अशी माहिती वाहतूक पोलीस अधीक्षक बोन्स्युएट दा सिल्वा यांनी काल दिली.

… तर परवाना रद्द झाला असता
पणजी येथे बसविण्यात आलेल्या एआय कॅमेऱ्याने सदर मर्सिडीज कारला ओव्हरस्पीड प्रकरणी सात वेळा नियमभंग करताना टिपले असून, त्या वाहनमालकाच्या मोबाईल क्रमांकावर चलन पाठविण्यात आली आहेत. सदर कारमालकाने दंडाचे चलन भरले असते, तर त्याचा परवाना रद्द झाला असता, असेही सिल्वा यांनी सांगितले. सदर मर्सिडीज कार ही मेघना सावर्डेकर यांच्या मालकीची आहे.

कारचालक मद्याच्या नशेत
बाणस्तारी अपघातात अटक करण्यात आलेला मर्सिडीज कारचा चालक मद्याच्या नशेत असल्याचे आढळून आल्याने त्याच्या विरोधात संबंधित कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे सिल्वा यांनी सांगितले.

प्रमाणापेक्षा अधिक मद्य प्राशन
परेश सावर्डेकर हा मद्याच्या नशेत कार चालवत असल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झाले आहे. 30 या पर्मिसिबल लिमिटपेक्षा तिप्पट पटीने अधिक मद्याचे
प्राशन कारचालकाने स्पष्ट झाले. त्याच्या रक्तात मद्याचे प्रमाण 90 एमजी प्रति 100 एमएल एवढे आढळून आले.

गतिरोधक घालणार
सर्व्हिस रोडवरून सदर मर्सिडीज कार भरधाव वेगाने मुख्य रस्त्यावर आल्याने चुकीच्या दिशेने जाऊन पणजीहून फोंड्याच्या दिशेने जाणाऱ्या तीन कारगाड्या आणि दोन दुचाकी वाहनाने ठोकरले. वाहतूक पोलीस विभागाने सदर अपघात स्थळाची पाहणी केली असून, बाणस्तारी येथील सर्व्हिस रोडवर वाहनांच्या गती नियंत्रणासाठी गतिरोधक (रंबलर स्ट्रिप्स) घालण्याची शिफारस सार्वजनिक बांधकाम खात्याला केली जाणार आहे, असेही सिल्वा यांनी सांगितले.

परेश सावर्डेकरच कार चालवत होता : पोलीस
बाणस्तारी येथील भीषण अपघातानंतर मर्सिडीज कार कोण चालवत होता, यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना पोलिसांनी मात्र मर्सिडीज कार परेश सावर्डेकर हाच चालवत होता, असे स्पष्ट केले आहे. आपल्या पती आणि मुलांना वाचविण्यासाठी परेशची पत्नी अपघातानंतर कारचालकाच्या जागेवर बसली, असा दावा फोंड्याचे पोलीस उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल केला. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेली मर्सिडीज कार परेश सावर्डेकर हाच चालवत असल्याचे प्रत्यक्षदर्शी मिळाले आहेत, असा दावा शिरोडकर यांनी केला. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या जमावाने मर्सिडीज कार महिला चालवत असल्याचा दावा केला होता; मात्र तो पोलिसांनी फेटाळला आहे.