डिचोली (न. प्र.)
भातशेती पिकून तयार झाल्यानंतर पहिले कणीस ग्रामदैवत श्री महामाया देवीच्या चरणी अर्पण करण्याचा मये गावातील प्रसिद्ध ‘नवे’ उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.
मये गावातील इतर उत्सवांप्रमाणेच नवे उत्सवाला एक वेगळे महत्त्व आहे. भातशेती पिकल्यानंतर नवे केल्याशिवाय गावात भात कापणी केली जात नाही. मये गावातील हा नवे उत्सव तीन गावांशी संबंधित आहे. मये, डिचोली आणि वायंगिणी या तिनही गावांचे नवे श्री महामाया देवीच्या प्रांगणात केले जाते.
सुरुवातीस मयेचे चौगुले, वायंगिणी आणि डिचोलीच्या श्री शांतादुर्गा देवीचे चौगुले गावकरवाडा येथे असलेल्या ग्रामदेवता श्री महामाया देवीच्या प्रांगणात जमतात. येथून मग सर्वजण वाजत गाजत ‘मेस्ताची मळी’ या भातशेतीच्या स्थानी येतात. त्यानंतर शेतीची विडा वाहून विधीवत पूजा केली जाते. गार्हाणे झाल्यानंतर सर्वजण भात कापणीस सुरुवात करतात व नंतर कापलेली कणसे आपल्या माथ्यावर धरून सर्व ग्रामस्थ गावकर व चौगुले मानकरी ग्रामदेवतेच्या मंदिरात येतात.
मंदिरात आल्यानंतर सर्व कणसे देवीच्या पुढे ठेवून त्यांची विधीवत पूजा केली जाते व नंतर सर्वजण ‘नवे’ अर्थात कापलेली कणसे आपापल्या घरी घेऊन जातात व कणासांची पूजा करून आपल्या प्रवेशद्वारावर लावतात व थोड्या कणसांची खिचडी करून प्रसाद म्हणून खातात.