मनोहर पर्रीकरांनी सहकारी मंत्र्याकडे मुख्यमंत्रिपदाचा ताबा द्यावा ः कॉंग्रेस

0
119

आजारी असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा ताबा अद्याप कोणाकडेही दिला नसल्याने राज्याचे प्रशासन पूर्णपणे ठप्प पडल्याचा दावा काल कॉंग्रेसने केला. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आपल्या पदाचा ताबा कोणाही सहकार्‍याकडे द्यायला हवा कारण मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत प्रशासन पूर्णपणे ठप्प झाले आहे.

पर्रीकर हे आपल्या एखाद्या सहकारी मंत्र्याकडे पदाचा ताबा का देत नाहीत, असा सवाल नाईक यांनी यावेळी केला. तसेच आपल्या सहकार्‍यांवर त्यांचा विश्‍वास नाही काय असा प्रश्‍नही त्यांनी केला. आपले सहकारी मंत्री तसेच घटक पक्षातील मंत्र्यांवर त्यानी विश्‍वास दाखवण्याची गरज असल्याचे नाईक यांनी नमूद केले.
आरोग्य बरे नसताना पर्रीकर यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यासाठी मुंबईहून उपचार अर्ध्यावर सोडून घाई गडबडीत गोव्यात धावून येण्याची गरज नव्हती, असेही नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.

गृह व खाण खात्याचा
ताबा सहकार्‍याकडे द्यावा
पर्रीकर यांनी आपल्याकडे असलेल्या गृह व खाण ह्या महत्वाच्या खात्यांचा ताबा लवकरात लवकर कुणाकडे तरी द्यावा, अशी सूचनाही नाईक यानी यावेळी केली.

पर्रीकरांच्या आरोग्याविषयी
पारदर्शकता हवी ः शांताराम
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्याविषयी पारदर्शकता हवी, असे सांगून त्यासंबंधीची माहिती त्यांच्या पक्षाने अथवा सरकारने लोकांना द्यायला, हवी, असेही नाईक यांनी यावेळी सांगितले.