‘मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ हेच नाव वापरा

0
13

>> नागरी उड्डाण संचालकांचे जीएमआर कंपनीला पत्र

पेडणे तालुक्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावापुढे ‘न्यू गोवा’चा उल्लेख करता येणार नसल्याचे पत्र नागरी उड्डाण खात्याचे संचालक सुरेश शानभोग यांनी जीएमआर कंपनीचे सीईओ आर. व्ही. सेशन यांना पाठविले आहे.

‘मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव घोषित केल्यानंतरही जीएमआर कंपनीकडून ‘न्यू गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट’ असा उल्लेख केला जात होता. यासंबंधी स्थानिक युवक ज्ञानेश्वर वरक यांनी ईमेलद्वारे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री, गोवा राज्य प्राधिकरण मुख्य सचिव, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि राज्यपाल यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन अखेर ‘न्यू गोवा’ असा उल्लेख मनोहर नावाच्या आधी करता येणार नाही. फक्त मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ याच नावाने उल्लेख करावा लागेल, असे शानभोग यांनी पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

11 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटनावेळी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव दिले होते. त्यानंतर 4 जानेवारी 2023 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नावाला अधिकृतरित्या मान्यता देण्यात आली होती; परंतु जीएमआर कंपनीकडून न्यू गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट असेच नावे वापरले जात होते. सरकारसोबत केलेल्या कराराचे कंपनीकडून उल्लंघन होत असल्याचे ज्ञानेश्वर वरक यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले होते. करारातील सर्व अटींचे उल्लंघन करून जीएमआर कंपनीकडून न्यू गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट याच नावाचा वापर केला जात होता. अनेक ठिकाणी याच नावाचे फलक कंपनीने लावले होते.