- मीना समुद्र
कोवळे गवत खात वनराईतून संचार करणारी- ही वन्यपशूत दिसायला सुंदर, देखणी, डौलदार, चपळ हरणं खरोखरच मनहरण करणारी असतात. वनाचे सौंदर्य राखून आपण त्यांचा अधिवास टिकवायला हवा.
व्हॉट्सऍपवरल्या कुठल्याशा व्हिडिओत पंढरीच्या वारीला वारकर्यांबरोबर जाणारं सोनकांचनी हरीण पाहून खूप नवल वाटलं होतं. टीव्हीवरच्या दिंडी-पालख्यांबरोबर जाणार्या दृश्यात उगीचच कुठेतरी ते हरीण दिसतंय का ते पाहण्याचा मनाला नाद लागला. त्यानंतर दुसर्या एका व्हिडिओत दोन्ही बाजूच्या गर्द झाडीतून जाणारा रस्ता ओलांडून हरणांचे कळपच्या कळप या बाजूकडून त्या बाजूला वेगाने दौडताना पाहिले. एकाच दृश्याची पुनरावृत्ती केली आहे की काय असं वाटावं इतकी ती हरणं! आणि त्यानंतर आता माझ्या घरातच भिंतीवर टांगलेल्या या मखमली कापडावरच्या हरणांच्या चित्राकडे माझे लक्ष गेले आहे. गेले आहे म्हणण्यापेक्षा रोजचेच झालेल्या या चित्रातील हरणांनी लक्ष वेधून घेतले आहे.
लग्न होऊन गोव्यात संसार थाटल्यावर इथल्या बर्याच घरांतल्या हॉलमध्ये भिंतीवर टांगलेले गालिचे पाहून आपल्याकडेही भिंत सजवावी असे मनात आले. आणि त्याच सुमारास आवाज देत रस्त्यावरून फिरणार्या फिरस्त्याकडून हरणाचे आणि घोड्याचे अशी दोन चित्रे (छोटे मखमली हातभर लांबीचे आणि पाऊण हात रुंदीचे असे ते कापड) घेतली होती आणि आलटून-पालटून ती भिंतीवर लावत होते. त्यातले हरणाचे चित्र खूपच नयनमनोहर आहे. गर्द हिरवीगार झाडी असलेल्या वनातल्या जलाशयाच्या काठाशी थांबलेली ती साताठ हरणे पाण्यात पाय बुडवून उभी आहेत. कुणी पाणी पिण्यासाठी वाकली आहेत आणि बाकीची कान उभारून चोहीकडे सतर्कतेने पाहत आहेत. त्यात एकटाच शिंगं असलेला काळवीट आहे. बाकी सार्या बहुतेक माद्या असाव्यात. हरीण हा अतिशय देखणा, डौलदार प्राणी. बघत राहावा असा. या चित्रात तर तो डौल उठून दिसत आहे. बुट्टेदार सोनकांतीची हरणं… पाठीवर पांढर्या तिरक्या टाक्यांनी विणल्यासारखी काळी बोटाच्या रुंदीची रेघ. पोटाचा मानेखालचा पांढरट भाग. सुंदर डोळे- ज्यांची उपमा स्त्रीच्या सुंदर डोळ्यांना दिली जाते. हरणांच्या डोळ्यांत भित्रा आणि सतर्क भाव. तरूंची छाया पडून सावळे पांढरे दिसणार्या पाण्यात या हरणांचे प्रतिबिंब लाटांवर हेलकावल्यामुळे पाण्यात कांचनरंग मिसळून पाणीही सोनसळी झाले आहे. अतिशय मनभावन असे हे चित्र! खूप दिवसांनी इतक्या नीटपणे त्याच्याकडे पुन्हा लक्ष गेले आणि हरणाचे खूपसे संदर्भ मनापुढून दौडू लागले…
त्यातला सगळ्यात जुना संदर्भ रामायणाचा. मारीच राक्षसाने हरणाचे रूप घेऊन कपटाने वनवासी रामाला पर्णकुटीबाहेर येण्यास भाग पाडले. सीतेला त्या कांचनमृगाचा मोह पडल्याने तिचा हट्ट पुरविण्यासाठी तो बाहेर पडला. (‘मज आणुनी द्या हो हरिण अयोध्यानाथा’ असे महाकवी गदिमांनी त्याचे वर्णनही ‘गीतरामायणा’त केले.) नंतर रामाच्या आवाजात लक्ष्मणाला हाका मारल्याने लक्ष्मण धावत गेला आणि रावणाने सीताहरण केले. लहानपणी सीतेचं हरण (हरिण) का केलं असा प्रश्न पडला तेव्हा ‘हरण’ करणे म्हणजे ‘पळवणे’ असा अर्थ आजीने सांगितला आणि माझ्या शब्दकोशात भर पडली.
तरी पुन्हा ‘महाभारता’ची कथा ऐकताना द्रौपदीवस्त्र‘हरण’ असा शब्द ऐकून दुर्योधनाने दुःशासनाला द्रौपदीची वस्त्रं हरण म्हणजे पळविण्यास का सांगितले ते काही बरोबर कळेना. या दोन्ही शंकांना उत्तर म्हणून आणखी एक अर्थ पुढे आला तो म्हणजे ‘वस्त्रहरण’ म्हणजे वस्त्राचे हरण किंवा ते पळवणे नसून ‘वस्त्र फेडणे’ हा अर्थ कळला. पण ती कृती त्या वयातही अतिशय घृणास्पद वाटली.
त्यानंतर ‘हरण’ पुन्हा ‘वस्त्रहरण’ या नाटकात भेटले. त्यावेळी मात्र त्याच्या अर्थाबाबत आम्ही निःशंक झालो होतो. ‘शिवलिलामृता’तली श्रीधराची शिवरात्रीची कथा तर हरणांचीच आहे. हरिण रानावनात राहणारा प्राणी. अतिशय चपळ. पण जास्तीत जास्त शिकार होणारा… अशाच वनसंपन्न भागात एक व्याध शिकारीसाठी गेला असता शिवमंदिरातली पूजा पाहून शिवाचा नामघोष करत दिवसा शिकार न मिळाल्याने रात्री सरोवराकाठी बेलाच्या गर्द पानात लपून सावज शोधू लागला. तेव्हा तिथे आलेल्या हरिणीवर बाण रोधला असता ती गर्भिणी असल्याने तिचा वध केल्यास कोणती पापे लागतील ते तिने सांगितले. ती स्वर्गातली शापित रंभा होती. शिवपूजा टाकून वाममार्गाने गेल्याने ती व तिचा सखा आणि तिच्याशी संबंध ठेवणारा हिरण्यदैत्य हे सारे शिवाच्या शापामुळे मृगयोनीत जन्माला आले. दुसरी हरिणी कामपिडित, तिसरी पाडसाला पाजण्यासाठी व्याकूळ यांच्यासह मृग तहान भागविण्यासाठी सरोवरापाशी आला आणि व्याधाला शास्त्रार्थ ऐकवून त्यांची सर्व कर्तव्ये करून परत येण्याची शपथ घेतली. पाडसांसहित सर्वजण मरणासाठी हजर झाले आणि ‘आधी आम्ही मरू’ असे प्रत्येकजण म्हणू लागला तेव्हा चार पायांच्या पशूंपुढे दोन पायांच्या माणसाने लोटांगण घातले. हरिणांमुळे त्याला जगण्याचे अध्यात्म कळले. त्यांची हत्या घडली नाही आणि शिवरात्रीला पर्वकाळी नामस्मरण आणि अनासाये बेलपत्रांनी घडलेली शिवपूजा यामुळे तो उद्धरून गेला आणि हरणे शापमुक्त झाली, अशी ही हरणांची रोचक कथा.
निसर्गसमृद्धता आणि वनसंपन्नता यामुळे पूर्वी प्राणिजीवनही संपन्न होते. हळूहळू अन्नधान्याचे, वनस्पती संरक्षण-संवर्धनाचे शोध लागत गेले. पण प्राणिहिंसा ही त्याकाळी निषिद्ध मानली जात नसे. हौस किंवा छंद म्हणूनही राजे-महाराजे जंगलात शिकारीला जात आणि पक्षी, प्राणी यांची शिकार करीत. महाकवी कालिदासाने महाभारतातील ‘शाकुंतल’ स्वप्रतिभेने रचले त्यातही राजा दृश्यंत शिकारीसाठी कण्व ऋषींचा आश्रम असलेल्या वनात येतो. हरणांचा पाठलाग करतो. त्याने हरणांवर रोखलेला बाण ‘आश्रमातल्या मृगावर बाण मारू नको’ अशा ऋषिकुमारांच्या विनवणीवरून मागे घेतो- असा उल्लेख आहे. शकुंतला ही तर साक्षात निसर्गकन्याच. तिला वृक्षवल्लींबद्दलही प्रेम आहे. आणि हरणांच्या संगतीत ती मुग्ध कटाक्ष शिकली. आईवेगळ्या हरिणपाडसाचे संगोपन त्याला घास भरवून ती करते आणि दर्भांकुर टोचून झालेल्या तोंडातील व्रणांवर इंगुदी तेल लावते. सासरी निघताना ‘गर्भमंथर हरिणीची सुवार्ता मला कळवा’ असे पित्याला सांगते. हरणे पाळली जातात आणि त्यांचा लळा लागतो हे आपल्याला पावलोपावली दिसून येते. एरव्ही आपण हल्लीच्या काळी हरणे पाहतो ती फक्त अभयारण्यातच. या हरणांची किंवा मृगांची आणखी एक विशेष जात म्हणजे कस्तुरीमृग. ‘मेघदूता’त कस्तुरीमृगाने विश्राम केल्यामुळे तेथील शिळा सुगंधी झाल्या आहेत असा हिमालयाचा उल्लेख येतो. आपल्या नाभीत सुगंध आहे हे कस्तुरीमृगाला माहीत नसते आणि तो धाव धाव धावतो त्याच्या शोधात! तेव्हा ‘तुझे आहे तुजपाशी’ असे त्याच्यासारख्याच धावणार्या माणसाला म्हणावे लागते. हरणाला ‘सांबर’ असेही म्हणतात. संस्कृतात हरणाला ‘मृग’ संज्ञा आहे. त्यामुळे शिकार करण्याला ‘मृगया’ म्हणतात. सुंदर डोळे असलेल्या स्त्रीला मृगनयनी, हरिणाक्षी, मृगाक्षी म्हटले जाते. चंद्रावर हरणासारखा डाग म्हणून त्याला ‘मृगांक’ म्हटले जाते. चकाकत्या उन्हामुळे दूर पाणी आहे असे वाटून हरणे पळत सुटतात. तिथपर्यंत पोचल्यावर ते पाणी नसून पाण्याचा आभास आहे हे त्यांना कळूनही पुन्हा दूर तसेच पाणी पिण्यासाठी ती धावतात. त्यामुळे त्या फसव्या पाण्याला ‘मृगजळ’ आणि हरणांच्या तहानेला ‘मृगतृष्णा’ म्हटले जाते. मृग याचा अर्थ पशू असाही; त्यामुळे सिंहाला ‘मृगेंद्र’ (पशूंचा राजा) म्हटले जाते. हरणांचा स्वभाव भोळाभाबडा, गरीब, मवाळ; नेत्र चंचल-चपळ असले तरी सहज शिकार होते. त्यामुळे एखाद्या यौवनांगेला ‘सावध हरिणी सावध गं, करील कुणीतरी पारध गं’ असा इशारा दिला जातो, तर कुणाला तिच्या डोळ्यातली ती आर्तता हवी असते म्हणून ‘रानहरिणी दे गडे भीती तुझी ही’ अशी मागणीही असते. कळपाने राहण्याचा त्यांचा स्वभाव घेण्यासारखा. जातिवर्णभेदाच्या भिंती भेदून जाऊ इच्छिणारी कान्होपात्रा ‘हरिणीचे पाडस व्याघ्रे धरीयेले’ अशी कासाविशी व्यक्त करते तेव्हा आपले मनही कासावीस होेते.
कोवळे गवत खात वनराईतून संचार करणारी- ही वन्यपशूत दिसायला सुंदर, देखणी, डौलदार, चपळ हरणं खरोखरच मनहरण करणारी असतात. वनाचे सौंदर्य राखून आपण त्यांचा अधिवास टिकवायला हवा.