मधुमासासम दरवळणारे…

0
186
  • गिरिजा मुरगोडी

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हा गंधबहर वेगवेगळ्या प्रकारे निरंतर साथसंगत करून राहतो… आतून उमलण्यासाठी ऊर्जा पुरवत राहतो! आणि असे क्षण हेच मधुमासासम दरवळणारे कळ्या-फुलांचे गाव होऊन जातात.

काही गोष्टींशी लहान वयापासून ओळख आणि जवळीक झालेली असेल तर आयुष्य समाधानी आणि समृद्धही होत जातं. त्यातलीच एक गोष्ट- हिरवाई! हिरवाई म्हणजे समृद्धी, हिरवाई म्हणजे तजेला, हिरवाई म्हणजे प्रसन्नता…
निसर्गाची नाळ संवेदनशील मनाशी आणि संवेदनक्षम वयातही फार लवकर आणि सहज जुळते. कारण निसर्ग हा स्वाभाविक, सच्चा, पटकन आपलंसं करणारा असाच असतो. माझा मुलगा लहान असताना त्यानं स्वतः कुंडीत एक सदाफुलीचं रोप लावलं होतं. त्याला पहिलं फूल आलं तेव्हा कोण आनंद झाला होता त्याला! अन् आज त्याचा मुलगा शाळेच्या प्रकल्पाचा भाग म्हणून बी रूजवणं, त्याला फुटणारे अंकुर-पानं यांचं निरीक्षण करणं, रोपाची निगा राखणं हे करत असतानाचं त्याचं कुतूहल, उत्सुकता, उत्साह आणि आनंद पाहताना वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतं. वृक्षवेली सगेसोयरे बनून आपणाला कायम आनंदच देत असतात.

माझ्याही मनात लहानपणीच ही हिरवाईची ओढ रूजली होती आणि पुढच्या आयुष्यात ती अंकुरत, फुलत गेली. आतापर्यंत ज्या-ज्या घरात राहिलो- अंगणात, परसात, गच्चीत, गॅलरीत, अगदी पहिल्या मजल्यावर दोन फ्लॅट्‌सच्या मधल्या भागात… जिथे जिथे शक्य झालं तिथे छोट्या-मोठ्या बागा फुलवल्या, अनुभवल्या, मनःपूत आनंद घेतला. या हिरवाईचं खूप ऋण आहे नेहमीच. आणि या हिरवाईसह फुलून येणार्‍या कळ्या-फुलं म्हणजे तर अपूर्वाईचं देणं आणि लेणं! अंतरंगातून उमलणार्‍या सद्भावनांचं मूर्त रूप असावं इतकं कोमल तरल काही… त्यांच्या गंधकोषी प्रत्यक्ष परमात्म्याचं अस्तित्व असावं इतकं सुंदर परम मांगल्य… अंतःस्फूर्तीचं जणू मूर्त रूप!
हा रंग-गंध बहर बारशाच्या पाळण्यापासून सोबत वावरू लागतो तो आयुष्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी साथ देत आनंद वाढवत जातो. लहान असताना फुलं केसांत माळण्यापासून ते बाईंना देण्यापर्यंत प्रसन्न हळवेपण जपत आणि संक्रमित करत राहतात. तरुण असताना तर किती प्रसंग, सोहळे यांच्याच साथीने सजत असतात. मैत्री असो, प्रेम असो, रुसवा मिटवणं असो की आगळ्या खास भावना व्यक्त करणं; यांच्याशिवाय कोण मदतीला येणार?
लग्न, डोहाळजेवण (फुला माळणं), वेगवेगळे सण-समारंभ, स्वागत, सत्कार, निरोप, पूजा… प्रत्येक वेळी या सुकुमार कुसुमकोमलांशिवाय ना सुरुवात होऊ शकत, ना पूर्तता!
आपल्या नितांतसुंदर गोव्यात तर रसिकमनांनी, रसिकजनांनी या फुलांचे किती उत्सव करावे! वेगवेगळ्या मंदिरांमधली रोजची आराससुद्धा अनेक रंगीबेरंगी फुलं आणि हिरवीगार पानं गुंफून अगदी नेत्रसुखद अशी केलेली असते. मंगल आणि हर्षद वातावरण निर्माण करणारी ती आरास… विशेष प्रसंगी तर या सर्वांचा कळस होणं अगदी स्वाभाविकच. विविध देवदेवतांच्या मंदिरांचे वार्षिक रथोत्सव असोत, विविध मंदिरांमधून केली जाणारी जायांची पूजा असो वा नवरात्रीतला वैशिष्ट्यपूर्ण मखरोत्सव असो- अतिरम्य अशी फुलांची आरास थक्क करणारी असते.

याशिवाय अनेक ठिकाणी अनेक वेळा आणि अनेक प्रकारे या हिरवाईने, भरभरून उमललेल्या फुलांनी मोहात पाडलेय. कधी साथसोबही केली आहे. आम्ही मनालीला गेलो होतो तेव्हा तिथल्या घरा-घरांसमोरच्या बागांमध्ये ज्या प्रकारे भरगच्च गुलाब फुललेले दिसत ते पाहून डोळ्याचं पारणं फिटत असे. अगदी खालपासून वरपर्यंंत वाढलेल्या हिरव्यागर्द वेली आणि त्यांवर गुच्छागुच्छाने लहडलेले ते गुलबक्षी लाल गुलाब… आहाहा!
काश्मीरचे बगीचे, सर्वदूर पसरलेली हिरवाई, ते चार चिनार, मुघल गार्डन्समधले टपोरे सुंदर गुलाब कसे विसरता येतील? उटी, कुन्नूर येथील बॉटेनिकल गार्डन्स, गुलाबाच्या बागा यांनीही स्मृतींचा कप्पा नेहमी सुगंधित ठेवलाय. बेंगलोरमधील सुंदर बगीचे तर मोहवतातच, पण ठिकठिकाणी विक्रीसाठी ठेवलेले मोगरा, छोटे-छोटे गुलाब आणि अबोलीचे ढीग, हार, वेण्या, गजरे हेही वेडावून टाकणारच! या स्मृती जाग्या झाल्या की इलाहींच्या शब्दांत म्हणावंसं वाटतं-
मधुमासासम दरवळणारे कळ्या-फुलांचे गाव तुझे
तुझ्या गावची रोज घ्यायची खुडून संध्याकाळ मला
या सर्वांपेक्षा एक वेगळी आठवण आहे ती परदेशातल्या वेगळे धागे जुळलेल्या बागेची. सिडनीला भावाकडे काही महिने राहिले असता त्याची प्रिय बाग जिनं मला आनंद देण्याबरोबरच दिलासा आणि सोबतही केली होती, ती विसरता येत नाही. त्यानं फार निगुतीनं फुलवलेली. पण त्याच्या आजारपणामुळे जिची रया जात चालली होती. ती बाग परोपरीनं फुलवताना मिळालेला आनंद आणि त्याहीपेक्षा जास्त त्याच्या डोळ्यांत दिसणारं समाधान याचं मोलच वेगळं! त्या काळातलं मनावर पुन्हा पुन्हा येणारं मळभ दूर करणारी ती हिरवाई आणि अनेकरंगी फुलं-पानं यांच्याबद्दल कृतज्ञता वाटते. आता भाऊ आमच्यात नसताना तर त्या सगळ्या क्षणांत मन व्यापून राहतं, अगदी हळवं करून जातं. आता जेव्हा भावजय कधीतरी त्या बागेतल्या बहराचे आठवांनी आणि आसवांनी भिजलेले फोटो पाठवते तेव्हा वाटतं हा जणू सांगतोय तिला,
ही डहाळी ठेवून जातो तुझ्यासाठी
जेव्हा बहरून येतील फुलं याच्यावरती
तेव्हा मी नसेन कदाचित; पण जाणवेल तुला
हा माझाच गंध आहे… हा आहे माझाच बहर…
कवीचे हे शब्द आठवतात आणि पाठोपाठ दोन आसू नकळतच ओघळतात… त्या बहरावरचे दवबिंदू बनून…
फुलं आपल्या जगण्याशी खूप जोडलेली असतात. मला तर कधीकधी शब्द, त्यांचा मोहर, बहर, त्याचं मनाच्या अंगणात टपटपणं हेसुद्धा फुलांसारखं वाटतं. ते कधी गुलमोहर होऊन येतात, कधी प्राजक्त, कधी चाफा तर कधी बहावा… कधी वहीच्या पानातली बकुळफुलं असतात तर कधी उंबराचं फूल बनून प्रतीक्षा करायला लावतात. अशी त्यांची वेगळीही सोबत.
लहान वयात मनाची नाळ हिरवाईशी आणि या गंधबहराशी एकदा जुळली की आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हा गंधबहर वेगवेगळ्या प्रकारे निरंतर साथसंगत करून राहतो… आतून उमलण्यासाठी ऊर्जा पुरवत राहतो! आणि असे क्षण हेच मधुमासासम दरवळणारे कळ्या-फुलांचे गाव होऊन जातात.