मतभेद विसरून संघटित होण्याची गरज

0
47

>> विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत सोनिया गांधींचे आवाहन

कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काल शुक्रवारी प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत १९ पक्ष सहभागी झाले होते. विरोधी पक्षांची एकजूट आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर रणनीती तयार करण्याच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी नियोजनबद्ध आराखडा बनवावा लागेल आणि दबाव आणि अडचणींवर मात करावी लागेल. सर्व मतभेद विसरून एकत्र काम करण्याची गरज आहे. याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे यावेळी सोनिया गांधी यांनी सांगितले. या बैठकीला तृणमूल कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, द्रमुक, जेएमएम, सीपीआय, सीपीएम, नॅशनल कॉन्फरन्स, आरजेडी, एआययूडीएफ, व्हीसीके, लोकतांत्रिक जनता दल, जेडीएस, आरएलडी, आरएसपी, केरळ कॉंग्रेस मनिला, पीडीपी आणि आययूएमएलचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आपल्या सर्वांना मर्यादा आहेत. पण देशाच्या हितासाठी या गोष्टींच्या वर उठण्याची वेळ आली आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक हे आपल्या लक्ष्य आहे. हे एक आव्हान आहे. आपण एकत्र येऊन त्याचा सामना करू शकतो. आपल्याला हे करावेच लागेल. कारण एकत्र काम करण्याशिवाय आपल्याकडे कुठलाही पर्याय नाही, असे यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या. या बैठकीत पुढील वर्षी पाच राज्यांच्या होणार्‍या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांची एकजूट वाढवण्याच्या पर्यायांवरही चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधींची दिल्लीत भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांची एकजूटता वाढवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर पुढाकार घेण्याचे आवाहन ममता बॅनर्जींनी केले होते.