- –सौ. क्षमा प्रशांत प्रियोळकर
(सहशिक्षिका)
मुले शाळेत आल्यापासून अनेकवेळा एका वाक्याचा उल्लेख वारंवार ऐकायला मिळतो, ते वाक्य म्हणजे ‘आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक आहेत’. हे ऐकता ऐकता पाच-सहा वर्षं संपत येतात आणि मुले नागरिक व्हायच्या पायरीवर पोचतात. आता आपली आठवी- नववीची मुले पुढच्या निवडणुकीत मतदार बनणार आहेत. नागरिक मग ते आताचे असोत किंवा उद्याचे, त्यांचा लोकशाहीत महत्त्वाचा वाटा असतो. लोकशाहीचे यश लोकांच्या सहभागावर अवलंबून असते.
आपल्या देशातील लोकशाही ही जगातील फार मोठी लोकशाही आहे. लोकशाहीत नेते निवडण्याचे काम लोकांचे असते. लोकशाही म्हणजे ‘लोकांचे लोकांसाठी लोकांनी चालवलेले राज्य’. या ठिकाणी निवडणुकीला फार महत्त्व असते. त्यातूनच देशाचे भवितव्य ठरते.
भावी मतदारांना कळले पाहिजे की संविधानाने आपल्याला मुलभूत हक्क दिलेले आहेत. पण त्याचबरोबर आपली कर्तव्यही आहेत. मतदान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. ही जाणीव एकदा त्यांना झाली की आपली लोकशाही यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही. यासाठी काही पावले उचलावी लागतील.
- लोकांकडे उमेदवाराविषयी जास्तीत जास्त माहिती पोचली पाहिजे.
- भावी मतदारांना मतदान प्रक्रियेविषयी शिक्षित केले पाहिजे, जेणेकरून भ्रष्टाचाराला आळा बसेल.
लोकशाहीचा पायाच निवडणुकीवर स्थित आहे. मतदान हा आपला सांविधानिक अधिकार आहे. आपण खूप भाग्यवान आहोत, आपल्याला तो मिळालेला आहे.
मतदान म्हणजे मतांचा सागर पण तरीही प्रत्येक मताला तेवढीच किंमत आणि सर्व जबाबदारी कोणावर तर मतदारराजावर! लोकशाहीत प्रत्येक नागरिक राजा आहे आणि राजा म्हटले की जास्त जबाबदारी आली खांद्यावर.
आपल्या देशातील निवडणूक आयोग जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे. ऐंशी वर्षांवरील वृद्धांचे मत त्यांच्या घरी जाऊन घेण्याची व्यवस्था केलेली आहे. ज्याला हात नाहीत त्याच्या पायाचे ठसे घेण्याची व्यवस्था आहे. हेतू एवढाच की १०० टक्के मतदान व्हावे. मग आपण का मागे रहावे?
जागा हो मतदारराजा, जागा हो! सर्व भारतवासीयांची जबाबदारी तुझ्यावर आहे. देशाचे भवितव्य तुझ्या हातात आहे.