मणिपूरमधील भ्याड हल्ला

0
33
  • दत्ता भि. नाईक

कर्नल त्रिपाठींच्या कुटुंबीयांची हत्या केल्यामुळे आता हा विषय सुरक्षादलांपुरता राहिलेला नाही. देशातील सर्वच्या सर्व कुटुंबवत्सल नागरिकांचा हा विषय बनलेला आहे. आता कठोर निर्णय घ्यावेच लागतील.

मणिपूर हे भारताच्या ईशान्येकडील अष्टलक्ष्मी म्हणजे आठ राज्यांपैकी एक आहे. स्वातंत्र्यापूर्वी मणिपूर हे संस्थान होते. स्वातंत्र्यानंतर केंद्रशासित प्रदेश व १९७२ साली मणिपूरला घटक राज्याचा दर्जा मिळाला. सत्तावीस लाख लोकसंख्या असलेले हे छोटेखानी राज्य. गौरांग प्रभूच्या वैष्णव संप्रदायाचा येथे मोठा प्रभाव आहे. मणिपुरी नृत्य विशेषकरून भागवतातील कथानकांवर आधारलेले असते. मेईतेई, वैष्णोई व नागा अशा तीन प्रमुख जमाती येथे राहतात. सर्वधर्मसमभावाचा लाभ उठवून येथे धर्मांतराचे प्रयोग चालतात. ख्रिस्ती मिशनरी जनतेच्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्यांचे धर्मांतर करतात व आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे धर्माला अफूची गोळी मानणारे माओवादी त्यांना मदत करतात. स्वतःच्या प्रभावाखालील क्षेत्राचा विस्तार करायचा व इतर देशांचे विभाजन करण्यासाठी मिळेल त्या मार्गाचा अवलंब करायचा हा त्यांचा नेहमीचा कार्यक्रम असतो. ओडिशामध्ये ख्रिस्ती धर्मात गेलेल्यांची घरवापसी करणारे लक्ष्मणानंद सरस्वती हे वास्तविकपणे ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या दृष्टीने क्रमांक एकचे शत्रू असायला हवे होते; परंतु त्यांची हत्या माओवाद्यांनी केली यावरून हे संबंध किती खोलवर व दृढ झालेले आहेत हे लक्षात येते.

शोकग्रस्तांच्या पाठीशी देश
या विषयाला पुन्हा एकदा वाचा फुटण्याचे कारण म्हणजे, मणिपूरमधील चुराचंदपूर जिल्ह्यातील सेहकन नावाच्या म्यानमार सीमेवरील गावात आसाम रायफल्सच्या खुगा बटालियनचे सर्वोच्च अधिकारी कर्नल विप्लव त्रिपाठी, त्यांची पत्नी, त्यांचा सहा वर्षांचा मुलगा व चार अन्य अधिकारी यांची आय.ई.डी.च्या आधारे विस्फोट घडवून व मोठ्या प्रमाणात गोळीबार करून हत्या केली. मूळ छत्तीसगडमधील असलेले कर्नल त्रिपाठी कुटुंबीयांसह जात होते याचा अर्थ या ठिकाणी कोणताही हल्ला होण्याची शक्यता नाही असे धरून सर्वजण चालले होते. गाफील राहून चालणार नाही हाच संदेश या घटनेवरून संपूर्ण देशाला मिळत आहे. या घातपाती हल्ल्यात इतर सहा सैनिकही जखमी झाल्याचे वृत्तपत्रांतील बातम्यांवरून समजते.

हल्लेखोरांजवळ चिनी बनावटीची एके-४७ रायफल्स होती. थोड्याच वेळानंतर मणिपूरच्या पिपल्स लिबरेशन आर्मी व मणिपूर नागा पिपल्स फ्रंट या दोन संघटनांनी घातपाताची जबाबदारी स्वीकारल्याचे वृत्त आहे. योगायोग म्हणजे चिनी सेनादलासही पिपल्स लिबरेशन आर्मी या नावाने ओळखतात.
भारतीय सेनादलांनी म्यानमारच्या हद्दीत घुसून कारवाई केल्यापासून ही सीमारेषा बरीच शांत होती. ४ जून २०१५ रोजी अशाच प्रकारच्या हल्ल्यामध्ये राज्याच्या चंडेल जिल्ह्यात डोग्रा रेजिमेंटच्या ताफ्यावर हल्ला करून अठरा भारतीय सैनिकांना ठार मारले होते.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, याचप्रमाणे सेनादलप्रमुख नरवणे यांनी पूर्ण माहिती घेऊन उपाययोजना सुरू केली असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही हल्लेखोरांचा निषेध करून आपण सर्वजण शोकग्रस्त कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत असा संदेश दिला.

हा जागतिक कार्यक्रम
विप्लव त्रिपाठींच्या व्यतिरिक्त मरण पावलेल्या सेनाधिकार्‍यांची नावे सुमन स्वागियारी, खटनेई कोनयाक, आर. पी. मीणा व श्यामल दास अशी आहेत. याशिवाय अन्य चारजण गंभीररीत्या जखमी झालेले आहेत. या घटनेमुळे देशाविरुद्ध युद्ध पुकारलेल्या सर्व गटांच्या बाबतीत आतापर्यंत चालत आलेल्या भूमिकेत बदल करावा लागणार आहे.

चीनची भूमिका नेहमीच विस्तारवादी राहिलेली आहे. जिथे सीमा भिडते तिथे सतत तणाव सुरू ठेवावा व जिथे सीमा भिडत नाही अशा ठिकाणी आतंकवाद्यांना शस्त्रे पुरवावी हा चीनचा अविरत चाललेला कार्यक्रम आहे. चीनमध्ये माओ झेडोंगने शस्त्राच्या बळावर सत्ता प्रस्थापित केली होती. द्वितीय महायुद्धामुळे सर्व मोठ्या सत्ता थकलेल्या होत्या. सत्ता ज्या पद्धतीने प्रस्थापित केली गेली ते मार्ग आणि अफगाणिस्तानमधील तालिबानचा मार्ग यांच्यात कोणताही फरक नाही, आणि म्हणूनच चीन आज अफगाणिस्तानच्या सत्ताधार्‍यांच्या पाठीशी आहे. विश्‍वातील सर्व देश काही दिवस चरफडतील व नंतर तालिबानला मान्यता देतील. चीनच्या बाबतीतही हेच घडले होते. माओच्या कम्युनिस्ट शस्त्रधार्‍यांनी कुओ मिनटांग पक्षाचे सरकार उलथवून लावले तेव्हाही पाश्‍चात्त्य देश नवीन बदलास मान्यता देण्यास तयार नव्हते. ज्या देशाच्या सत्तेचा इतिहासच असा रक्ताळलेला आहे तो देश कोणत्याही देशाशी शांततापूर्ण व्यवहार करत असेल तर ते नाटक आहे असेच समजावे.

भारताचे विभाजन निरनिराळी निमित्ते पुढे करून करावे हा एक जागतिक कार्यक्रम आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील माओवादी विद्यार्थ्यांनी ‘मणिपूर मॉंगे आजादी’ अशी घोषणा दिली होती हे वाचकांच्या लक्षात असेलच. अशा या जगातील मजूर, शेतकरी, गरीब, दलित, वंचित इत्यादींच्या कल्याणासाठी अवतीर्ण झालेल्या लोकांचा भारत व त्याचे ऐक्य हा क्रमांक एकचा शत्रू आहे. युरोपीय व आफ्रिकी लोक वर्णाने वेगवेगळे असले तरीही रक्तगट सारखेच असतात असे पोटतिडकीने सांगणारे विद्वान भारतात मात्र वेगवेगळे राष्ट्रसमूह असल्याचा शोध लावतात. वंशाचे काय घेऊन बसलात म्हणणारे सज्जन उत्तर भारतीय आर्य व दक्षिण भारतीय द्रविड आहेत असा प्रचार करतात. ईशान्येकडील जनजातीमध्ये काही प्रमाणात मोंगोलोईड चेहरेपट्टी असते म्हणून ते भारतीय नाहीत असा हे मानवतावादी प्रचार करतात. याचाच एक भाग म्हणून ईशान्येकडील राज्यांमध्ये फुटीरतावादी आंदोलनांना हवा दिली जाते.

मऊ तिथे खणले जाते
भारताच्या संरक्षण विषयक विभागाने ब्रह्मोस, पृथ्वी, अग्नी यांसारखी क्षेपणास्त्रे विकसित केलेली आहेत. त्यामुळे भारत बलवान होणार व आक्रमक राष्ट्र बनणार असाही प्रचार आंतरराष्ट्रीय पातळीवर केला जातो. या क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन पाहून काहींच्या पोटात दुखते. आता ही सर्व क्षेपणास्त्रे दिल्लीत प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमास प्रदर्शनासाठी बनवलेली नाहीत. ती देशाच्या सीमेवर तैनात केली गेली पाहिजेत. अशा वेळी देशातील सर्व पक्ष व संस्था-संघटनांनी सरकारला मदत केली पाहिजे. क्षेपणास्त्रे सीमेवर न्यायची असतील तर सध्याचे रस्ते पुरणार नाहीत. रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची आवश्यकता असते. सध्या देशामध्ये अनेक संस्था उभ्या राहिलेल्या आहेत, ज्या पर्यावरणाच्या नावाखाली रस्त्यांची रुंदी वाढवण्याच्या कामात अडथळा आणतात. न्यायालयात विषय नेऊन कामावर स्थगिती आणण्याचा प्रयत्न करतात. याउलट चीनने सीमारेषेवरून मूळ निवासी असलेल्या तिबेटींना हटवून हान वंशाच्या चिनी लोकांची वसाहत उभी केली आहे. ज्याप्रकारे चीनची तयारी चालू आहे त्यावरून चीनला युद्धाची खुमखुमी आहे हे लक्षात येते. चीनने हल्ली स्वतःच्या सीमा ठरवणारा कायदा पारित करण्याची तयारी चालवलेली आहे. त्यानुसार सीमेवरील शेजारील देशांचे म्हणणे ऐकून घेण्याची तरतूद या कायद्यात असणार नाही.

एका बाजूने सीमेवर तणाव उत्पन्न करायचा व अंतर्गत भागात दहशतवादी घुसवायचे हा चीनचा दुहेरी उपक्रम आहे. काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून, म्यानमारच्या सीमेवरून व देशातील काही भागांत नक्षलवादी-माओवाद्यांकडून जोरदारपणे आक्रमण करणे हा चीनचा मनसुबा आता उघडा पडलेला आहे. महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर सव्वीस माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षादलांना यश आले आहे. त्यामुळे देशातील लोकहिताचा मुखवटा पांघरलेले सर्वजण चेकाळतील व हा देश आता सुरक्षित राहिलेला नाही अशी हाकाटी करतील. कर्नल त्रिपाठींच्या कुटुंबीयांची हत्या केल्यामुळे आता हा विषय सुरक्षादलांपुरता राहिलेला नाही. देशातील सर्वच्या सर्व कुटुंबवत्सल नागरिकांचा हा विषय बनलेला आहे. आता कठोर निर्णय घ्यावेच लागतील. रामायणाच्या अयोध्याकांडातील एकविसाव्या सर्गात लक्ष्मण रामाला सांगतो, तू मऊपणा दाखवू नकोस. कारण मऊ माती कोपराने खणली जाते. याचा आपणास विसर पडता कामा नये.