मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
केंद्र सरकारच्या ‘अमृत’ योजनेखाली राजधानी पणजी मागोमाग आता राज्याची सांस्कृतीक राजधानी अशी ओळख असलेले मडगाव शहर तसेच उत्तऱ गोव्यातील एक प्रमुख शहर असलेले म्हापसा व दक्षिण गोव्यातील वास्को या शहरांचाही स्मार्ट सिटी म्हणून विकास करणे शक्य आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले.
काल पणजी गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या आमसभेत बोलताना त्यांनी वरील उद्गार काढले. यावेळी त्यांनी विकसित भारत 2047 संबंधी बोलताना हरित गोवा, स्वच्छ गोवा व विकसित गोवा 2037 वर भर दिला.
2047 पूर्वी गोवा हे भारतातील पहिले विकसित राज्य बनवण्यात गोवा सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्याच्या पायाभूत सुविधांवर सरकार व उद्योगांनी मिळून 6 हजार कोटी रु. हून अधिक गुंतवणूक केली असल्याचे ते म्हणाले. स्वच्छ व हिरवा गोवा बनवण्याचे ध्येय तर आहेच पण त्याचबरोबर भविष्यात नवे प्रकल्प तसेच उद्योगांसाठी सरकार आपले दरवाजे सदैव खुले ठेवणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कार्यक्रमाला उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्ष प्रतिमा धोंड, मावळते अध्यक्ष उद्योगपती श्रीनिवास धेंपो तसेच गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे अन्य पदाधिकारी हजर होते.
औद्योगिक क्रांतीसाठी उद्योग
क्षेत्राने पुढाकार घ्यावा
औद्योगिक क्षेत्राने गोव्याला स्वच्छ आणि हरित ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. गोव्याते औद्योगिक क्रांतीसाठी उद्योग क्षेत्राने पुढाकार घ्यायला हवा. यासाठी सरकार उद्योग क्षेत्राला सर्वतोपरी सहकार्य करेल असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
आम्ही गोव्यात हरित उद्योगांना प्राधान्य देत असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी नुकतेच आयपीबीने याच धर्तीवर प्रकल्प मंजूर केले आहेत. राज्यात जलमार्गांचा विकास हा इको टुरिझम, वॉटर टॅक्सीसाठी केला जात असल्याचे स्पष्ट केले.
कचऱ्याची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावण्यासाठी उद्योग क्षेत्राने पुढे यावे असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. काही समस्या असल्यास सरकारसोबत चर्चा करावी. आम्ही उपाययोजना करण्यास तयार आहोत असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
श्रीनिवास धेंपोंचे अभिनंदन
‘व्हिजन फॉर गोवा 2037’साठी गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे मावळते अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी दिलेले योगदान तसेच त्यांचे नेतृत्त्व यासाठीही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी त्यांचे कौतुक केले.