मडगाव येथील सध्या गाजत असलेले स्वप्निल वाळके या सराफाच्या खुनाचे प्रकरण जलदगतीने तपासासाठी गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे सुपूर्द करण्यात आले असून यासंबंधीचा आदेश पोलीस महासंचालकांनी काल जारी केला आहे.
राज्यात बुधवारी दिवसाढवळ्या झालेल्या स्वप्निल वाळके यांच्या खून प्रकरणाच्या तपास कामाच्या गतीबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा जलदगतीने तपास करण्यासाठी प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. या प्रकरणाचा विविध अंगांनी तपास केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मडगाव येथील सराफ स्वप्निल वाळके यांच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात गुन्हा अन्वेषण विभागाने महत्वाची भूमिका बजावून या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेऊन मडगाव पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत. या प्रकरणात आणखी दोघांचा समावेश असून दोघेही फरारी आहेत. मडगाव पोलिसांनी या प्रकरणामध्ये केवळ दोघांना अटक करून दहा दिवसांचा रिमांड घेतला आहे.