मडगाव कोविड इस्पितळात १७० खाटा

0
145

 

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी खास आरक्षित करण्यात आलेल्या मडगांव येथील ईएस्‌आय् इस्पितळातील खाटांची संख्या ६० वरून १७० एवढी वाढवण्यात आली असल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी काल सांगितले. रुग्णांचा आकडा वाढू लागल्याने खाटांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे राणे म्हणाले.

१७० खाटांबरोबरच आणखी ३० खाटा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. आणीबाणीच्या प्रसंगी वापरता याव्यात यासाठी या अतिरिक्त ३० खाटा आरक्षित ठेवण्यात येणार असल्याचे सांगून त्यामुळे एकूण खाटांचा आकडा २०० एवढा होत असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
कोविड रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर अभिनंदनास पात्र असल्याचे सांगून हॉस्पिसियो इस्पितळाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. इरा आल्मेदा, आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. जुझे डिसा, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर व आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी या खाटा वाढवण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे राणे यांनी नमूद केले.

कोविड-१९ विरोधात लढा देण्यासाठी जे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व अन्य लोक आघाडीवर राहून काम करीत आहेत त्यांचा आपणाला अभिमान असून संपूर्ण गोवा या लोकांना सलाम करीत असल्याचे राणे यानी सांगितले.