पणजीतील विद्यालयांसाठी कुजिरा बांबोळी येथे ज्या प्रकारचे ‘शाळा संकुल’ उभारण्यात आले आहे, तसाच प्रकल्प मडगाव शहरातील विद्यालयांसाठी दवर्ली येथे उभारण्यास जमीन संपादित करण्यात आलेली आहे. या प्रकल्पात मडगाव शहरातील ज्या शैक्षणिक संस्थांना स्थलांतरित व्हायचे आहे, त्यांना तेथे भूखंड देण्याचे काम पुढील तीन महिन्यांत हाती घेण्यात येणार असल्याची माहिती काल शिक्षणमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. दवर्ली येथे शाळा संकुलासाठी 1 लाख चौरस मीटर एवढी जमीन यापूर्वीच संपादित करण्यात आलेली आणि तेथे कुजिरासदृश्य शैक्षणिक केंद्र उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आमदार विजय सरदेसाई यांनी काल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना शिक्षणमंत्र्यांनी वरील माहिती दिली.सदर शैक्षणिक केंद्रात विद्यालयांना इमारती बांधण्यासाठी भूखंड दिले जातील. त्याचबरोबर क्रीडांगण, शिक्षकांसाठी प्रशिक्षण केंद्र व अन्य सुविधा असतील, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली.