फाईल मंजुरीसाठी एका मंत्र्याला 15 ते 20 लाख रुपयांची लाच द्यावी लागल्याचा माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केलेला आरोप खोटा आहे, असे स्पष्टीकरण भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार अरुण सिंग यांनी काल पणजीतील भाजप मुख्यालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिले.
भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी अरुण सिंग हे गोव्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी पांडुरंग मडकईकर यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतल्यानंतर एका मंत्र्याने आपली एक फाईल मंजूर करण्यासाठी 15 ते 20 लाख रुपये लाच घेतल्याचा आरोप केला होता.
यासंबंधीच्या प्रश्नावर बोलताना अरुण सिंग म्हणाले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार प्रामाणिक आणि भ्रष्टाचारमुक्त काम करीत आहे. मडकईकरांनी केलेला आरोप खोटा असून, त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईबाबत चर्चा सुरू आहे.
मडकईकर यांनी केलेला आरोप बिनबुडाचा आहे, याची गोव्यातील जनतेला माहिती आहे. भाजपचे सरकार गोव्याच्या विकासासाठी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करीत असल्याने जनता भाजपला पुन्हा निवडून आणत आहे, असेही सिंग यांनी सांगितले.
भाजपच्या कार्यकाळात गोव्याच्या मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. काँग्रेस सरकारपेक्षा भाजप सरकारने गोव्याच्या विकासासाठी 381 टक्के जास्त आर्थिक साहाय्य दिले आहे, असेही सिंग यांनी यावेळी नमूद केले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांची उपस्थिती होती.