मच्छीमारी बंदी यंदा ६० दिवस

0
66

येत्या पावसाळ्यात १ जून ते ३१ जुलै दरम्यान मच्छीमारी बंदीच्या प्रस्तावास सरकारने मान्यता दिली आहे, परंतु मच्छीमारांनी सदर बंदीचा काळ आणखी पंधरा दिवस वाढविण्याची मागणी केल्याने त्यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच सरकारला सादर करणार असल्याचे खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

यापूर्वी मच्छीमारी बंदीचा काळ १५ जून ते ३१ जुलै पर्यंत होता. नव्या सरकारने त्यात बदल केला होता. आता बंदीचा काळ आणखी वाढविण्यासाठी मच्छीमारीच पुढे आले आहेत. या काळात मासे अंडी घालण्याचे काम करतात. अशावेळी मच्छीमारी केल्यास भविष्यकाळात माशांच्या प्रजाती नष्ट होण्याची शक्यता असते. समुद्रात मोठ मोठे ट्रॉलर बंदीच्या काळातही मासेमारी करतात. त्यामुळे काही जाती नष्ट झाल्या आहेत.

या व्यवसायावर हजारो कुटुंबे अवलंबून असून मत्स्य उत्पादन टिकून राहिले तरच भविष्यकाळातही हा व्यवसाय चालू राहू शकेल. त्यामुळेच बंदीच्या काळात मासेमारी करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. बंदीचा काळ वाढविल्यास उत्पादनास बर्‍याच प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी आलेमाव समर्थकच बंदीचा काळ वाढविण्यास विरोध करीत होते. हे मच्छीमारांच्या सध्याच्या धोरणामुळे सिद्ध झाले आहे.