मच्छीमारांसाठी शनिवारपासून मार्गदर्शक सूचना जारी करणार

0
167

कोविडच्या पार्श्‍वभूमीवर मच्छीमारी खात्याकडून राज्यात येत्या १ ऑगस्टपासून सुरू होणार्‍या मच्छीमारी हंगामासाठी खास मार्गदर्शक सूचना (एसओपी) जारी करण्यात येणार आहेत. मच्छीमारी ट्रॉलर्सनी पकडलेल्या मासळीपैकी १० टक्के मासळी स्थानिक पातळीवर विक्रीसाठी देण्याची अट घालण्यात येणार आहे, अशी माहिती मच्छीमारमंत्री फिलीप नेरी रॉड्रीगीस यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन मंत्री रॉड्रीगीस यांनी मच्छीमारी हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर विविध विषयांवर चर्चा केली. राज्यातील मच्छीमारी बंदी ३१ जुलैला पूर्ण होत असून १ ऑगस्टपासून मासेमारी हंगाम सुरू होत आहे. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर मच्छीमारी जेटीवरील गर्दी टाळण्यासाठी खात्याकडून खास एसओपी जारी केली जाणार असून जेटीवर देखरेख ठेवली जाणार आहे.

मच्छिमारी खात्याकडून एलईडी पद्धतीच्या मच्छीमारीवर कारवाईसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कारवाई केली जाणार आहे. मच्छीमारी व्यावसायिकांना नोंदणी सक्तीची केली जाणार आहे. खात्याकडे पारंपरिक मच्छीमार, व्यावसायिक मच्छीमारांनी नोंदणी केली पाहिजे, असेही मंत्री रॉड्रीगीस यांनी सांगितले.