राज्यातील जनतेने भाजप व कॉंग्रेसचे शासन अनुभवले असून यंदा त्यांनी तृणमूल कॉंग्रेस – मगो युतीला संधी द्यावी. म्हापसा मतदारसंघात युतीचे उमेदवार ऍड. तारक आरोलकर यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन मगोचे सर्वेसर्वा तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी केले. म्हापसा येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ऍड. तारक आरोलकर यांच्या प्रचारात ते सहभागी झाले होते.
तत्पूर्वी, त्यांनी बोडगेश्वर देवस्थानात जाऊन देव बोडगेश्वराचे दर्शन घेऊन युतीला विजयी करण्याची प्रार्थना केली. यावेळी त्यांच्या समवेत ऍड. तारक आरोलकर, म्हापसा मगो गट समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. १९६३ ते आतापर्यंत मगोच्या सरकारांनी सर्वोत्तम प्रशासन दिले होते, असे मत माजी आमदार तथा निवृत्त न्या. फर्दिन रिबेलो यांनी व्यक्त केले आहे, अशी आठवण त्यांनी करून दिली.
दरम्यान, ऍड. आरोलकर यांनी काल प्रभाग क्रमांक १० मध्ये प्रचार केला. त्यांच्यासोबत सुदिन ढवळीकर, तुषार टोपले प्रचारात सहभागी झाले. यावेळी श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानात जाऊन त्यांनी श्रींचे दर्शन घेतले. दरम्यान, म्हापशातील टॅक्सी चालकांनी ऍड. तारक आरोलकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.