जिल्हा पंचायत निवडणूक
येत्या १३ रोजी होणार्या पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी व आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रश्नावर कृती – कार्यक्रम आखण्यासाठी व भावी रणनीती ठरवण्यासाठी प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मगोशी युती करणे किंवा न करणे याचा निर्णय ही समितीच घेईल असे प्रदेश भाजप अध्यक्षांनी सांगितले. सोमवारच्या कळंगुट येथील चिंतन बैठकीत मगोसंबंधी कोणताही निर्णय झालेला नसल्याचे ते म्हणाले.या समितीवर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, कला आणि संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकर, उत्तर गोव्याचे खासदार व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर, कुंदा चोडणकर यांचा समावेश आहे.
या समितीने पणजीचे पक्ष उमेदवार म्हणून सिद्धार्थ कुंकळकर यांच्या नावास औपचारिक मान्यता दिली असून पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या मान्यतेसाठी त्यांचे नाव दिल्लीला पाठवले आहे. त्याला केंद्रीय समितीची मान्यता आज मिळेल व त्यानंतर कुंकळकर यांचे नाव अधिकृतपणे जाहीर केले जाईल. सिद्धार्थ यांनी दि. २४ जानेवारीस अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजीतील मान्यवर लोकांसमवेत एक बैठक घेतल्याचे समजते.
दरम्यान, भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कळंगुट येथे झालेल्या चिंतन बैठकीत युतीसंदर्भात काही निर्णय झालेला नसला, तरी या वादासंदर्भात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ‘मगोला सत्तेपासून दूर ठेवण्याचा विचारही भाजपच्या डोक्यात येऊ नये.’ असे सांगत ‘स्वतःच्या पायांवर कुर्हाड मारून घेणार्यांना कोण अडवणार?’ असे सूचक वक्तव्य सांत आंद्रेचे भाजप आमदार विष्णू वाघ यांनी काल पत्रकारांपाशी केले. गेल्या विधानसभा निवडणुकीत मगोचा भाजपला लाभ झाला व मगोमुळेच भाजप सत्तेत येऊ शकला याची श्री. वाघ यांनी आठवण करून दिली. जिल्हा पंचायतीची निवडणूक वेगळी असते. या निवडणुकीसाठी मगोशी युती करावी किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार भाजपला आहे असे त्यांनी सांगितले. सोमवारी रात्री झालेल्या चिंतन बैठकीचे निमंत्रण मिळाले होते, परंतु कार्यक्रमाचा तपशील कळविण्यात आला नव्हता, असे वाघ यांनी सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला वगळण्याच्या दृष्टिकोनातून भाजपने सध्या गांभीर्याने विचार चालवल्याची कल्पना मगो नेतृत्वाला आली असून त्यामुळे मगोने आपला पक्ष बळकट करण्यावर भर दिला असल्याचे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले. भाजपच्या चिंतन बैठकीत वरील प्रश्नी निर्णय होईल अशी भाजप समर्थकांची अपेक्षा होती, परंतु अद्याप त्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. चिंतन बैठक संपल्यानंतर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व भाजपच्या एका नेत्याची पणजीतील हॉटेलमध्ये बैठक झाल्याने तर्कवितर्क व्यक्त केले जात असले, तरी मिळालेल्या माहितीनुसार सदर बैठक पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या विषयावर होती, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
ज्यांना चिंता असते, त्यांना ‘चिंतन’ लागते : वाघ
‘ज्या लोकांना चिंता असते, त्यांना चिंतन बैठकीची गरज भासते.’ आपली पदे सरकारने का काढून घेतली याचे उत्तर अजून मिळालेले नाही. काढून घेतली गेलेली पदे आपल्याला पुन्हा मिळेपर्यंत आपण पक्ष बैठकीस जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाच्या नेतृत्वाला आपण यापूर्वीच हे कळवलेले आहे.