मंदिर जीर्णोद्धार, पुनर्बांधणी : अहवाल सादरीकरणासाठी मुदतवाढ

0
8

राज्य सरकारने पोर्तुगीज राजवटीत नष्ट झालेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणी आणि जीर्णोद्धारासाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीला अहवाल सादर करण्यासाठी येत्या 31 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्य सरकारने पोर्तुगीज राजवटीत नष्ट झालेल्या मंदिराच्या पुनर्बांधणी आणि जीर्णोद्धारासाठी डॉ. वर्षा कामत यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांच्या तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली आहे. या समितीला नियुक्तीनंतर केवळ तीस दिवसात म्हणजे 12 फेब्रुवारी 2023 पर्यंत अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली होती; मात्र या मुदतीमध्ये तज्ज्ञ समितीला अहवाल सादर करणे शक्य झालेले नाही. आता, या समितीला अहवाल सादर करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. या तज्ज्ञ समितीला अंतरिम निष्कर्षाचा अहवाल वेळोवेळी सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.
राज्य सरकारने मागील अर्थसंकल्पात पोर्तुगीज काळात नष्ट झालेल्या धार्मिक स्थळांच्या जीर्णोद्धार आणि नूतनीकरणासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद केली होती. तसेच पुरातत्त्व खात्याने नागरिकांकडून पुराव्यांसह अशा स्थळांची ओळख पटविण्यासाठी अर्ज मागवले होते. पोर्तुगीज काळात नष्ट करण्यात आलेल्या पुरातन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी अनेक अर्ज सादर करण्यात आले आहे. या समितीकडून या अर्जांची छाननी करून अहवाल सादर केला जाणार आहे.

डॉ. वर्षा कामत यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांच्या समितीमध्ये डॉ. रोहित फळगावकर, डॉ. वरद एस. सबनीस, बालाजी शेणॉय, उल्हास के. प्रभुदेसाई यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुरातत्त्व खाते आणि तज्ज्ञ समिती यांची संयुक्त बैठक घेऊन या विषयावर चर्चा केली आहे.