मंत्रिमंडळ पुनर्रचनेविषयी मुख्यमंत्र्यांचे मौन

0
10

>> पत्रकारांच्या प्रश्नाला दिली बगल

डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोवा मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यात येणार असल्याची चर्चा बऱ्याच काळापासून ऐकू येत असली तरी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे त्याबाबत मौन बाळगून असल्याचे दिसून येत आहे. काल बुधवारीही पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ पुनर्रचनेविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी परत एकदा त्याबाबत मौन बाळगणेच पसंत केले.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल्‌‍. संतोष यांचे काल बुधवारी पहाटे अल्पकाळासाठी गोव्यात आगमन झाले. संतोष हे काल पहाटे दाबोळी विमानतळावर उतरले आणि त्यांनी हुबळीचा (कर्नाटक) रस्ता पकडला. या घटनेची चाहूल लागल्यानंतर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना गोवा मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेविषयी प्रश्न केला होता. त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, त्याविषयी भाष्य करण्याचे सोडून मौन बाळगल्याचे दिसून आले. पत्रकारांच्या प्रश्नाला बगल देत मुख्यमंंत्र्यांनी, बी. एल्‌‍. संतोष यांचे गोव्यात आगमन झाले होते. मात्र, ते गोव्यातून कर्नाटककडे गेले असल्याचे सांगितले.

गेल्या सप्टेंबर महिन्यात काँग्रेस पक्षाच्या 11 आमदारांपैकी 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या आठ आमदारांत मायकल लोबो, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व आलेक्स सिल्वेरा या दिग्गज नेत्यांच्या समावेश होता. त्यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यात येणार असल्याच्या चर्चेला तेव्हा वेग आला होता. काँग्रेसमधून भाजपमध्ये फुटून आलेल्या 8 आमदारांपैकी 5 आमदारांची महामंडळांसह अन्य पदे देऊन सध्या सोय करण्यात आलेली आहे.
मात्र, दिगंबर कामत, मायकल लोबो व आलेक्स सिल्वेरा यांचे घोंगडे अद्याप भिजत पडलेले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ पुनर्रचनेची चर्चा अधूनमधून सुरू असते.

काँग्रेसचे आणखी दोन आमदार
लवकरच भाजपवासी ः आप

काँग्रेस पक्षाचे आणखी दोन आमदार आपल्या पक्षाला रामराम करीत सत्ताधारी भाजप पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे काल आम आदमी पक्षाने पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. आम आदमी पक्षाचे निमंत्रक अमित पालेकर यांनी पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला.

काँग्रेसचे दोन आमदार येत्या रविवारपर्यंत आपला पक्ष सोडून भाजपात प्रवेश करण्याचा तयारीत असल्याचा खळबळजनक आरोप पालेकर यांनी केला. अलिकडच्या काळात तीन काँग्रेस आमदारांपैकी कोणत्या दोन आमदारांनी भाजपशी जवळीक साधली आहे हे तुम्हीच ठरवा, असे पालेकर यावेळी बोलताना म्हणाले.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचे काल गोव्यात अल्पकाळासाठी आगमन झाल्याच्या पार्श्वभूमीवर अमित पालेकर यांनी हा आरोप केला आहे. पालेकर यांनी केलेल्या या आरोपामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.