Home बातम्या मंत्रिमंडळात फेरबदल होणारच; आता केवळ पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची प्रतीक्षा

मंत्रिमंडळात फेरबदल होणारच; आता केवळ पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची प्रतीक्षा

0

>> भाजपच्या गाभा समितीतील नेत्याची माहिती; वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या गोविंद गावडेंसह आणखी दोघा मंत्र्यांचा पत्ता कट होणार?

गोवा मंत्रिमंडळ फेररचनेचे पडघम आता वाजू लागलेले असून, या फेररचनेसाठीचे ‘काउंट डाऊन’ आता सुरू झाले आहे, अशी चर्चा सध्या सत्ताधारी भाजपच्या गोटामधून ऐकू आहे. आता केवळ केंद्रातील नेत्यांच्या आदेशाची प्रतीक्षा असून, एकदा त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाला की विनाविलंब ही मंत्रिमंडळ फेररचना मूर्त रूप घेईल, असे भाजपच्या गाभा समितीतील एका नेत्याने काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी एका जाहीरसभेत बोलताना मंत्री गोविंद गावडे यांनी खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे असलेल्या आदिवासी कल्याण खात्यात भ्रष्टाचार चालू असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यामुळे त्यांचे मंत्रिमंडळातील स्थान धोक्यात आले असून, त्यांची गच्छंती ही जवळ-जवळ निश्चित असल्याचे मानले जात आहे. मात्र, तसे असले तरी त्यासंबंधीचा अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठी काय ठरवतात त्यावर अवलंबून असणार असल्याचेही सदर नेत्याने काल स्पष्ट केले. या मंत्रिमंडळ फेररचनेत आण दोन ते तीन मंत्री बदलले जाण्याची शक्यता सदर नेत्याने व्यक्त केली.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे सध्या दिल्लीत तळ ठोकून आहेत. आपण गोव्यात आल्यानंतर सोमवारी मंत्री गोविंद गावडे यांना भेटीसाठी वेळ दिलेला असून या भेटीत त्यांचे म्हणणे ऐकून घेणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे.

भाजपकडून कमालीची गुप्तता
सध्या सत्ताधारी भाजप मंत्रिमंडळ फेररचनेसंबंधी कमालीची गुप्तता बाळगत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नवी दिल्लीत तळ ठोकून असलेले दामू नाईक यांनीही मंत्रिमंडळ फेररचनेसंबंधी जास्त काही न बोलण्याची भूमिका घेतली आहे. दामू नाईक व गोविंद गावडे यांची ठरल्याप्रमाणे सोमवारी बैठक होऊन चर्चा होते की त्यापूर्वीच गावडे हे राजीनामा देतील हे पहावे लागणार असल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. केंद्रातून तसा आदेश आल्यास गावडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

आलेक्स सिक्वेरांचे मंत्रिपद धोक्यात?
आजारी असून गोव्याबाहेर उपचार घेत असलेले कायदा व न्याय खात्याचे मंत्री आलेक्स सिक्वेरा यांचे मंत्रिपदही धोक्यात असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. गेल्या लोकसभा निवडणुकीत सिक्वेरा हे पूर्णपणे निष्प्रभ ठरले होते. परिणामी सत्ताधारी भाजपला ते नकोसे झाले आहेत. अशातच आता ते एका आजारी पडले असून, राज्याबाहेर उपचार घेत असल्याने त्यांचे मंत्रिपद त्यामुळे धोक्यात आले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मंत्रिमंडळ फेररचनेत दोन अथवा तीन नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तिघांना संधी द्यायची झाल्यास कुठल्या तिसऱ्या मंत्र्याला पदभार सोडावा लागेल, हे सांगता येत नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.