राज्य मंत्रिमंडळ पुनर्रचना केली जाण्याची शक्यता काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फेटाळून लावली. बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्याची गरज असून अकार्यक्षम अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे राज्यमंत्रिमंडळाची पुनर्रचना करणार असल्याचे म्हटले होते.
राज्याचे पर्यटनमंत्री हे अकार्यक्षम असून त्यांना काढून त्यांच्या जागी आमदार व पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे यांची वर्णी लावण्याची गरज असल्याचे मतही लोबो यांनी व्यक्त केले होते. काल त्यासंबंधी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना छेडले असता त्यांनी मंत्रिमंडळ पुनर्रचनेची शक्यता फेटाळून लावली. मंत्रिमंडळ पुनर्रचनेविषयी कोणत्याही मंत्र्याबरोबर आपली चर्चा झालेली नाही असे सांगतानाच त्याची आवश्यकताही नसल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळ पुनर्रचनेबाबत एखाद्या मंत्र्याने नव्हे तर पक्षाने निर्णय घ्यायला हवा, असेही सावंत म्हणाले.