मंगळवेध

0
148

अमेरिकेच्या नॅशनल एअरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन (नासा) ने सन २०३० पर्यंत मंगळावर मानवाला उतरविण्याची जोरदार तयारी चालवली आहे. ब्रह्मांडातील गूढ, अगम्य गोष्टींच्या शोधाची जिज्ञासा मानवाला काही स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळेच सातत्याने अंतराळामध्ये मोहिमा काढल्या जातात, अभ्यास केला जातो आणि पृथ्वीबाहेरील इतर ग्रहांवर मानवी वस्ती होऊ शकते काय, याचाही शोध भविष्याचा विचार करून घेतला जातो आहे. मंगळाच्या मोहिमेत अर्थातच आपला भारतही उतरलेला आहेच. भारताच्या वैज्ञानिक सामर्थ्याचे दर्शन आपल्या ‘मंगलयान’ ने जगाला घडविले. मंगळावर यान पाठवण्यात आजवर केवळ मोजक्याच देशांना यश आलेले आहे. त्यामुळे भारताने आपल्या मंगलयान मोहिमेद्वारे अमेरिका, रशिया आणि युरोपीय संघ यांच्या पंक्तीमध्ये स्थान पटकावले आहे. ब्रिटन आणि जपानसारख्या देशांचे मंगळवेध घेण्याचे प्रयत्न फसलेले होते हे येथे नमूद करायला हवे. ‘नासा’ आता पुढचे पाऊल टाकू पाहते आहे. मंगळाची, तेथील वातावरणाची थोडीफार कल्पना आजवरच्या मानवरहित मंगळ मोहिमांमधून आपल्याला आली असली, तरी प्रत्यक्षात त्याचा बराच भाग आजही आपल्याला अज्ञात आहे. त्यामुळे मंगळाविषयीच्या आजवर माहीत नसलेल्या बर्‍याच गोष्टींवर ‘नासा’ अभ्यास करू इच्छिते आणि त्यासाठी त्या ग्रहावर मानव उतरवणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीनेच या मोहिमेची जय्यत तयारी त्यांनी सुरू केली आहे. मंगळाचा अंतर्भाग या संशोधकांना अभ्यासायचा आहे. जमिनीखाली आठ – दहा मीटर खोदून तेथील मातीचे रूप आणि गुणधर्म त्यांना तपासायचे आहेत. २०२० साली मंगळावर दुसरे रोव्हर उतरवले जाणार आहे. त्या मोहिमेचीही तयारी सध्या चालली आहे. या सगळ्या धडपडीचे अंतिम उद्दिष्ट आहे ते म्हणजे मंगळावर कोणत्याही प्रकारची जीवसृष्टी आहे का याचा शोध. त्यासाठी पूर्वी कधी काळी मंगळावर जीवसृष्टी होती का, याचा अभ्यास गेली अनेक वर्षे जगभरातील संशोधकांनी चालवलेला आहे. अशा प्रकारचे संशोधन हे एकट्या दुकट्याचे काम नसते. जगभरातील अनेक संशोधनसंस्थांच्या ताळमेळातून, तेथील बुद्धिमंत संशोधकांच्या विचारमंथनातून ते हळूहळू पुढे सरकत असते. असे अनेक प्रकल्प आंतरराष्ट्रीय पातळीवर आज हाती घेण्यात आलेले आहेत आणि त्यांतील संशोधन हळूहळू पुढे सरकते आहे. एखाद्या अवकाश मोहिमेसाठी अनेक प्रकारच्या यंत्रणांचा मिलाफ घडवून आणावा लागतो. अनेक देशांचे यापैकी एकेका यंत्रणेमध्ये प्रावीण्य आहे. उदाहरणार्थ, भारताने आजवरच्या आपल्या संशोधनातून प्रक्षेपकांच्या तंत्रज्ञानामध्ये चांगले प्रावीण्य मिळवलेले आहे. आपल्या रडार यंत्रणाही नावाजल्या गेल्या आहेत. प्रत्येक देशातील वैज्ञानिक संशोधनाची अशी काही बलस्थाने असतात. त्यामुळे मंगळ मोहिमेसाठी नासा इतर देशांतील वैज्ञानिक संस्थांच्या मदतीने आखणी करते आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) ही त्यात मागे नाही. भारत आणि इस्राएलही यासंदर्भात संशोधन करते आहे. मंगळ ग्रहाविषयी भारतात पूर्वापार कुतूहल आहेच, कारण आपल्या प्राचीन ज्योतिर्विदांनी या ग्रहाबद्दल बरेच समज – गैरसमज निर्माण करून ठेवलेले आहेत. कुंडलीतल्या मंगळाचा फटका अनेकांना बसलेला आहे. वैज्ञानिकांच्या कुतूहलाचे कारण मात्र वेगळे आहे. मंगळ हा पृथ्वीला तुलनेने जवळ आहे. चंद्रापेक्षा तो पृथ्वीसारखा अधिक आहे. प्राणवायू निर्माण करू शकेल असे वातावरण त्याच्याभोवती आहे. शिवाय अनेक नवी माहिती तो मानवाला उपलब्ध करून देऊ शकतो. शिवाय अंतराळातून आपल्या पृथ्वीचाही अभ्यास करता येतो. त्यातून अनेक नव्या गोष्टी समजतात. अवकाशात अशा प्रयोगशाळा यापूर्वीच उभारण्यात आलेल्या आहेत. पृथ्वीवरील वातावरणात होणारे बदल, पृथ्वीच्या दिशेने येत असलेली अस्मानी संकटे, पाण्यासंबंधीच्या घडामोडी, हिमखंडांवर होणारे वातावरणाचे परिणाम अशा अनेक गोष्टी अवकाशातून अधिक चांगल्या रीतीने अभ्यासता येतात. जगभ्रमण पुरेनासे झाले म्हणून की काय, धनदांडग्यांच्या अवकाश सफरीचे वेधही अनेकांना सध्या लागले आहेत. त्यासाठी खासगी कंपन्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. एक दोन वर्षांत केवळ अनुभव घेण्यासाठी म्हणून अवकाश सफर सत्यात उतरू शकते. हे सगळे सुरू असताना लाल मंगळ मानवाला खुणावत राहिला आहे. असे दीर्घकालीन संशोधन एका पिढीत पूर्ण होत नसते. अनेक मानवी पिढ्या त्यासाठी खर्ची पडतात. परंतु अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्याची जिज्ञासा मानवाला स्वस्थ बसू देत नाही. त्यातूनच मंगळावर उतरण्याचे स्वप्न मानव सध्या पाहतो आहे.