खात्याचा निर्णय : खंडणीबहाद्दर शिपाई निलंबित
भ्रष्टाचार करणार्या पोलीस कर्मचार्यांविरुध्द कडक पावले उचलण्याचा निर्णय पोलीस खात्याने घेतलेला असून पर्यटकांना धमकावून त्यांच्याकडून १५ हजार रु.ची खंडणी वसूल केलेल्या एका पोलीस शिपायाला सेवेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यानी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.निलंबित करण्यात आलेल्या शिपायाचे नाव मेल्विन कार्दोज असे असून तो पर्वरी पोलीस स्थानकावर स्थानिक गुप्तचर विभागात काम करीत होता. सध्या मेल्विन कार्दोज हा फरारी आहे. त्याच्यावर फौजदारी गुन्हाही नोंद करण्यात आला असल्याचे गर्ग यांनी सांगितले.
वरील खंडणी उकळण्याचा प्रकार हा गेल्या ऑगस्ट महिन्यात घडला होता. घटनेनंतर पर्यटकांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे ईमेलद्वारे तक्रार नोंदवली होती. तर मुख्यमंत्र्यांनी ती ईमेल आपणाकडे पाठवून सविस्तर चौकशी करण्याचा आदेश दिला होता. त्याबाबत सविस्तर चौकशी केली असता तक्रारदार पर्यटक तीन युवक व तीन युवती रात्रौ २च्या सुमारास नेरूल येथील एलपीके या नाईट क्लबमधून आली असता त्यांच्या वाहनाला अपघात घडला होता. हा अपघात किरकोळ असा होता व या पर्यटकांनी दुसर्या वाहनातील लोकांशी बोलणी करून सामोपचाराने प्रकरण मिटवले होते. मात्र, याचवेळी पोलीस शिपाई मेल्विन कार्दोज हा आपल्या चार मित्रांसह साध्या वेशात आला व आपण पोलीस असल्याचे सांगून त्यांना धमकावू लागला. तसेच त्यांचा मोबाईल क्रमांक घेतला. ही पर्यटक मंडळी बेती-वेरेंच्या दिशेने चालली असता मेल्विन व त्याच्या मित्रांनी त्यांचा पाठलाग केला व त्यांना रस्त्यावर अडवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी मेल्विन व इतरांनी पर्यटक युवतींचा वेश्या असा उल्लेख करून या पर्यटकांकडून १५ हजार रु.ची मागणी केली. मात्र, त्यांनी पैसे नसल्याचे सांगताच मेल्विन व अन्यांनी त्यांना एटीएम कार्ड वापरून पैसे काढण्यास भाग पाडले व त्यांनी दिलेले १० हजार रु. घेऊन पोबारा केला. तक्रारदारांनी त्यांच्या वाहनांचा क्रमांक नोंद करून ठेवला होता. त्या आधारे मेल्विन कार्दोज याचा या प्रकरणात हात असल्याचे स्पष्ट झाले. मेल्विन याची बदली राखीव पोलीस विभागात करून नंतर त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले. तो सध्या फरारी असल्याने त्याच्याबरोबर कोण मित्र होते ते कळू शकले नसल्याचे गर्ग यांनी सांगितले.
स्थानिक गुप्तचर विभाग रद्द
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पोलीस स्थानकातील स्थानिक गुप्तचर विभाग रद्द करण्यात आल्याचे गर्ग म्हणाले. या विभागातील पोलीस भ्रष्टाचार करीत असल्याच्या वाढत्या तक्रारी होत्या. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
कोणताही पोलीस भ्रष्टाचारात गुंतला असल्याचे आढळून आल्यास ते यापुढे सहन केले जाणार नाही, असेही गर्ग यांनी यावेळी सांगितले. वरील पार्श्वभूमीवर लोकांना भ्रष्टाचारात गुंतलेल्या व खंडणीसाठी त्रास देणार्या पोलिसांविरुध्द तक्रार करता यावी यासाठी खात्याने एक ईमेल आयडी सुरू केलेली असून सेरिेश्रळलशर्.ींळसळश्ररपलशऽपळल.ळप
अशी ही आयडी आहे. शिवाय एक हेल्पलाईनही सुरू केलेली असून तिचा क्रमांक ७०३०१००००० असा आहे. १५ नोव्हेंबरपासून ही हेल्पलाईन सुरू होणार आहे. ‘शांती, सेवा, न्याय’ हे पोलिसांचे घोषवाक्य असल्याचे गर्ग यांनी यावेळी स्पष्ट केले.