भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक प्रशासनावर भर द्या

0
106

>> दक्षता खात्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची सूचना

सरकारच्या खातेप्रमुखांनी महसूल गळती रोखणे आणि नवीन महसूल निर्मितीवर भर देण्याची गरज आहे. तसेच खर्चात कपात करण्यावर भर दिला पाहिजे. भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक प्रशासनावर भर देण्याचे काम अधिकार्‍यांनी केले पाहिजे. गोवा स्वयंपूर्ण करण्यासाठी अधिकार्‍यांचे योगदान महत्त्वाचे आहे. राजकारणी धोरण तयार करतात. त्या धोरणाची अंमलबजावणी सरकारी अधिकार्‍यांनी केली पाहिजे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले. मुख्यमंत्री डॉ. सावंत काल दक्षता खात्याच्या कार्यक्रमात बोलत होते.

राज्यात कोरोना विषाणूचा फैलावाचे प्रमाण कमी झाल्याने सरकारी खात्यांनी आपल्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर नागरिकांना थेट प्रवेशापासून रोखण्यासाठी लावलेली टेबल हटविण्याची सूचना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या कार्यक्रमात बोलताना काल केली.
सरकारच्या ७० ते ८० खात्याची संकेतस्थळे बंद किंवा अपडेट केली जात नाहीत. राज्यातील अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षितपणामुळे नागरिकांना पाणी, वीज, स्वच्छतागृहाची समस्या भेडसावत आहे. खातेप्रमुखांनी या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी अधिक कार्यक्षम होण्याची गरज आहे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी खातेप्रमुखांना जबाबदारीने कामकाज करण्याची सूचना केली. नागरिकांची विविध कामांसाठी होणारी सतावणूक बंद करावी. सोमवार ते शुक्रवार हे पाच दिवस काम करायचे ही गोष्टी डोक्यातून काढून टाका. चोवीस तास काम करण्यावर भर द्या. मामलेदार, बांधकाम, वीज आदी प्रमुख खात्यात नागरिकांनी विविध कामासाठी हेलपाटे घालावे लागतात. नागरिकांची सतावणूक बंद करा, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
गोवा राज्य उघड्यावरील शौचमुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. तथापि, काही ठिकाणी नागरिकांना शौचालयाची सुविधा नाही, ही वस्तुस्थिती आहे. परराज्यातील लोकांना कायद्याबाहेर जाऊन सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र मूळ, गोमंतकीय नागरिक सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

आपणाला काही खात्याचे प्रमुख योग्य प्रकारे कामकाज करीत नसल्याची कल्पना आहे. कुठल्या खात्यात कोणता कारभार चालला याची सर्व माहिती मिळत असते. आपणाला खात्यातील विविध स्तरांवरील कर्मचार्‍याकडून माहिती मिळते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी मुख्य सचिव परिमल राय, दक्षता सचिव तारीक थॉमस, दक्षता खात्याचे संचालक संजीव गावंस देसाई यांची उपस्थिती होती.