भ्याड हल्ला

0
15

जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंच्या बसवर झालेला दहशतवादी हल्ला पाकिस्तानस्थित दहशतवादी शक्तींनी पुन्हा काश्मीरमध्ये डोके वर काढल्याचा ढळढळीत संकेत देत आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्याचे मंत्रिमंडळ शपथ घेत असतानाच रियासीतील तिर्याथ गावाजवळ त्याच सुमारास संध्याकाळी सव्वा सहा वाजता झालेला हा दहशतवादी हल्ला ही जणू पुन्हा सत्तेत आलेल्या मोदी सरकारला दिली गेलेली ललकारच आहे. चार सशस्त्र दहशतवाद्यांनी सैन्याच्या गणवेषात यात्रेकरूंच्या बसवर अंदाधुंद गोळीबार केला त्यात चालकाला गोळी लागल्याने त्याचा ताबा सुटून बस दरीत कोसळली म्हणून निदान काहीजणांचा जीव वाचला, अन्यथा बसमधील यात्रेकरूंना ह्या हैवानांनी जिवंत सोडले असते असे वाटत नाही. बस दरीत कोसळल्यानंतरही हे हैवान बसवर अंदाधुंद गोळीबार करीतच होते. आतील जीव वाचलेल्या यात्रेकरूंनी मरण पावल्याचा बहाणा केला म्हणूनच केवळ गोळीबार थांबला. ह्या हल्ल्यात निरपराध यात्रेकरू मारले गेले, कोवळी निष्पाप मुले बळी गेली. दहशतवादाविरुद्धच्या मोहिमेशी दुरान्वयेही संबंध नसलेल्या ह्या भाविकांना लक्ष्य करून दहशतवाद्यांनी काश्मीरमधील हिंदूंंच्या तीर्थयात्रा बंद पाडण्याचा पुन्हा एकवार प्रयत्न केला आहे. यापूर्वी वेळोवेळी अमरनाथ यात्रेवर हल्ले होत आले, परंतु तरीही अमरनाथ यात्रा दरवर्षी दुप्पट उत्साहात संपन्न होत असते. त्याचप्रमाणे शिवखोडी किंवा वैष्णोदेवी असो अथवा माता खीरभवानी किंवा अमरनाथ यात्रा असो, ह्या भीषण हल्ल्यानंतरही यात्रेकरू निधडेपणाने त्यात सामील झाल्यावाचून राहणार नाहीत. परंतु त्यांना सुरक्षा पुरवणे ही जबाबदारी सरकारची आहे. प्रस्तुत दहशतवादी हल्ला पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी केल्याचे सरकार म्हणत असले, तरी ज्या अर्थी ते भारतात येऊन दिवसाढवळ्या हा हल्ला करू शकले त्याचा अर्थ सुरक्षा यंत्रणांकडून कुठे तरी नक्कीच ढिलाई झाली आहे. मुळात यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या ह्या बसला कोणतेही पोलीस संरक्षण का नव्हते हा प्रश्नही उपस्थित होतोच. सात वर्षांपूर्वी अमरनाथ यात्रेकरूंवर अशाच प्रकारे अनंतनागमध्ये अंदाधुंद गोळीबार झाला होता. ह्या वर्षी पुन्हा दहशतवादी हल्ले वाढलेले दिसत आहेत. पहलगाममध्ये अलीकडेच एका पर्यटक महिलेला गोळी लागून ती जखमी झाली होती. गेल्या 13 मे रोजी एका बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात तिला आग लागून काही यात्रेकरू मृत्युमुखी पडले होते. हिंदू यात्रेकरू हे दहशतवाद्यांचे पहिले लक्ष्य असते हे माहीत असूनही कोणत्याही सुरक्षेविना परराज्यांतील यात्रेकरूंना केवळ दैवावर भरवसा टाकून जाऊ देणे गैर होते. ज्या भागात दहशतवादी हल्ला झाला तो डोंगराळ भाग आहे हे जरी खरे असले, तरी मुळात हे दहशतवादी तेथवर कसे पोहोचू शकले हाही प्रश्न आहे. गेल्या दोन तीन वर्षांमध्ये जम्मू विभागातील राजौरी, पूंछ आदी भागांत दहशतवादी कारवाया वाढीस लागलेल्या आहेत हे वेळोवेळी दिसत आले आहे. चिलखती गाड्यांचाही भेद करणाऱ्या 7.62 एमएमच्या पोलादी गोळ्यांचा वापर दहशतवाद्यांनी केल्याचे यापूर्वीच्या हल्ल्यांत आढळून आले आहे. वाहनांना चिकटवले जाणारे आणि रिमोट कंट्रोलद्वारे स्फोट घडविले जाणारे स्टिकी बॉम्बही हल्ल्यांमध्ये वापरले जात आले आहेत. वाहने वळणावर येताच त्यांची गती कमी होते त्यावेळीच हल्ले चढवले गेले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे होते. हा हल्ला जम्मूमध्ये म्हणजे हिंदुबहूल भागामध्ये झाला आहे. अलीकडे प्रत्यक्ष काश्मीर खोऱ्याऐवजी राजौरी, पूंछ वगैरे भागांत म्हणजे जम्मू विभागात दहशतवादी हल्ले वाढले आहेत, त्यामागील जिहादी इरादे स्पष्ट दिसतात. रियासीमध्ये झालेल्या ह्या हल्ल्याच्या निषेधाचे स्वर जेवढ्या तीव्रतेने देशातून उमटायला हवे होते तेवढे उमटलेले दिसत नाहीत. हल्ल्याच्या निषेधार्थ जम्मूमध्ये निदर्शने झाली तेवढीच. संपूर्ण देश राजकीय घडामोडींत दंग आहे. पाकिस्तानशी क्रिकेट सामन्याचा आनंद घेतो आहे. गाझामधील ‘राफा’ची चिंता करणाऱ्यांना ‘रियासी’वर बोलावेसे वाटत नाही. ह्या हल्ल्याची जबाबदारी द रेसिस्टन्स फोर्सने घेतली आहे. नाव काही असले तरी शेवटी ही पाकिस्तानी पिलावळ आहे. पाकिस्तानच्या पदराखाली राहून हे कट आखत आहे. पुलवामा घडले त्यानंतर बालाकोटच्या कारवाईद्वारे पाकिस्तानच्या नाड्या आवळल्या गेल्या होत्या. काश्मीरमधील दहशतवादाचीही मानगूट पकडली गेली होती. आज पुन्हा दहशतवाद्यांनी डोके वर काढलेले दिसते आहे. केंद्रात आता जरी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असले तरी नरेंद्र मोदींच्याच हाती तिचे नेतृत्व आहे. ह्या दहशतवादाच्या मुळाशी थेट सीमेपार जबरा घाव घालून आपल्या कणखरपणाचा पुनःप्रत्यय मोदी दाखवणार काय?