- सखाराम शेणवी बोरकर
केवळ अठ्ठेचाळीस वर्षांच्या भोबे यांच्या आयुष्यातील शेवटची दहा वर्षे हा त्यांचा लेखनकाळ होता. या दहा वर्षांत त्यांनी अकरा पुस्तके आणि हजारो पृष्ठे भरतील इतके विपुल साहित्य लिहिले. संगीत विषयावर तर ते साकल्याने लिहायचे. गोपालकृष्ण भोबे जन्मशताब्दीनिमित्ताने हा खास लेख…
गोव्यातील नेरुल या गावातील गोपालकृष्ण अनंत भोबे यांचा जन्म दि. ६ ऑगस्ट १९२० रोजी जन्माष्टमीच्या शुभदिनी झाला म्हणून बाळाला ‘गोपालकृष्ण’ हे नाव ठेवण्यात आले. त्यांना संगीताची फार आवड होती, परंतु घरची परिस्थिती अशा कलेला प्रोत्साहन देण्यासारखी नव्हती. एकत्रित कुटुंबाचे एक पारंपरिक भुसारी दुकान आणि छोटीशी बगायती होती. भोबे यांना संगीत, नाटक आणि चित्रकला यांची मनापासून आवड होती. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या भोबेंनी आर्थिक परिस्थितीमुळे वयाच्या तेविसाव्या वर्षापर्यंत चार इयत्ता मराठी आणि चार इयत्ता पोर्तुगीज शिक्षण घेतले आणि इ.स. १९४३ मध्ये ते मुंबईला गेले. मुंबईत गेल्या गेल्या आरंभी नाटकाचे पडदे रंगविणे, चित्रकलेच्या विविध अंगांचा अभ्यास करणे, नाटकांत कामे करणे अशा काही गोष्टींमध्ये त्यांनी स्वत:ला गुंतवून घेतले. नंतर त्यांना ‘नवयुग’ या हिंदी नियतकालिकेत चित्रकार म्हणून काम मिळाले. याच काळात त्यांची ओळख सुप्रसिद्ध नाटककार मो. ग. रांगणेकर यांच्याशी झाली आणि पुढे त्यांच्याच भाचीशी ते विवाहबद्ध झाले.
आयुष्यात काहीतरी करण्याची जिद्द असलेल्या भोबे यांनी आपले सर्व लक्ष लिखाणावर केंद्रित केले. इ.स. १९५८ पासून त्यांनी चित्रकला, संगीत या कलाविषयांवर समीक्षणात्मक लेखन करण्यास आरंभ केला. अनेक नियतकालिकांतील चित्रे काढण्याचे आणि समीक्षा लेखनाचे काम त्यांना मिळू लागले. शणै गोंयबाब यांच्या ‘आल्बुर्केकान गोंय कशें जिखलें?’ आणि बाकीबाब बोरकर यांच्या ‘पांयजणा’ या त्यांच्या प्रथम कोंकणी कवितासंग्रहाचे मुखपृष्ठावरील चित्र भोबे यांचे आहे हे खास नमूद करावेसे वाटते.
मुंबई आकाशवाणीवर त्यांचे गाण्याचे खास कार्यक्रमही होऊ लागले. आकाशवाणीवर श्रुतिका, सांगीतिका, नाटके आणि भाषणे देण्यासाठी त्यांना आमंत्रित केले जाऊ लागले. त्यांचा सर्व कलाक्षेत्रांतील हा वावर बघून त्यांना मुंबई आकाशवाणीवर ‘सर्वपल्ली गोपालकृष्णन’ अशा नावाने कौतुकाने हाक मारत. संपूर्ण महाराष्ट्रात संगीत विषयाचे मर्मज्ञ म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली. इतकेच नव्हे तर त्यांनी अनेक ग्रंथही लिहिले.
‘चतुरंग रेखा’-१९६१ (गोमंतक मराठी साहित्यसंमेलन सुवर्णपदक), ‘आलाप’- १९६३, ‘असा आहे माझा गोमंतक’- १९६४, ‘पक्षी जीवन’ (अनुवाद) १९६५, ‘नाद’- १९६६, ‘मासे आणि मी’- १९६६, ‘धन्य ते गायनी कळा’- १९६९, ‘कलात्म गोमंतक’- १९७२, ‘सात स्वरश्री’, ‘शापीत गंधर्व’ आणि ‘भारताचे भाग्य विधाते’ अशी एकूण अकरा पुस्तके त्यांनी लिहिली.
संगीतसम्राट तानसेनच्या जीवनावर आधारित ‘धन्य ते गायनी कळा’ हे संगीतप्रधान नाटक लिहून त्यांनी नाट्यलेखनात प्रवेश केला. गोमंतकातील जांबावलीच्या संस्थानातील श्रीदामोदर हे त्यांचे कुलदैवत. याच स्थानावर जाऊन हे नाटक लिहिण्याचा संकल्प त्यांनी सोडला होता. हे नाटक लिहून पूर्ण झाल्यानंतर त्याची संहिता घेऊन कुलदेव श्रीदामोदराच्या चरणाकडे ठेवण्यासाठी ते गेले असता तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तो काळा दिवस म्हणजे १३ फेब्रुवारी १९६८ (माघ शुद्ध चतुर्दशी १८८९) होय.
केवळ अठ्ठेचाळीस वर्षांच्या त्यांच्या आयुष्यातील शेवटची दहा वर्षे हा त्यांचा लेखनकाळ होता. या दहा वर्षांत त्यांनी अकरा पुस्तके आणि हजारो पृष्ठे भरतील इतके विपुल साहित्य लिहिले. संगीत विषयावर इतके साकल्यपूर्ण लेखन करणारा लेखक महाराष्ट्रात दुसरा झाला नाही असे म्हटल्यास अतिशयोक्ती वाटू नये. चालू २०२० हे त्यांचे शताब्दी वर्ष! ज्या महाराष्ट्रात त्यांनी अंतापर्यंत सेवा दिली, अनेक विषयांवर मराठीतून लेखन केले, त्या महाराष्ट्राने त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची साधी दखलही घेतली नाही. इतकेच कशाला, मराठीतील अनेक साहित्यिकांचे जन्मशताब्दी सोहळे मोठ्या डामडौलाने साजरे करणार्या गोमंतकातील मराठीप्रेमींनाही या कर्तृत्ववान गोमंतपुत्राची आठवणही होऊ नये हे गोमंतकीयांचे दुर्दैवच म्हटले पाहिजे!
एकूण गोवेकरांप्रमाणे मीही मत्स्यभक्त आहे. मासे खाण्याइतकेच मला माशांविषयीचे लिखाण वाचायलाही आवडते. मला येत असलेल्या कोणत्याही भाषेत माशांच्या संदर्भात काहीही छापून आलेले दिसले म्हणजे मासे खावेत तशाच चवीने मी ते वाचतो.
एके दिवशी गोपालकृष्ण भोबे यांच्या ‘मासे आणि मी’ या पुस्तकाविषयीचे लेखन माझ्या वाचनात आले. अशा विषयावरील हे एकमेव पुस्तक असल्याचे सांगून त्या लेखकाने या पुस्तकाची आणि पुस्तक लेखकाची चांगलीच स्तुती केली होती. त्यामुळेच ते पुस्तक वाचण्याची प्रबळ इच्छा मनात धरून मी ‘मासे आणि मी’ हे पुस्तक संपूर्ण गोव्यात शोधले तरी मला ते कुठेही सापडले नाही. मुंबई-पुण्यातील माझ्या मित्रांना मी त्या पुस्तकाविषयी सांगितले. एके दिवशी अचानक माझ्या मुंबईतील एका मित्राला ते पुस्तक एका ग्रंथालयात सापडले. त्याने लगेच त्याची छायाप्रत काढून मला पाठवली. त्या पुस्तकाला मुखपृष्ठही नव्हते, त्यामुळे ते पुस्तक प्रथमदर्शनी कसे दिसते याचा मला अंदाजही येईना. सुदैवाने त्यात सर्व लेख मात्र होते. ‘दुधाची तहान ताकावर’ आणि काय? मी अधाश्याप्रमाणे ते पुस्तक तत्काळ वाचून संपवले. नंतर काही वर्षांनी कोंकणीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. माधवबाब बोरकरांना पुस्तकाची प्रत सापडली आणि त्यांनी मला ती पाठवली. तोपर्यंत मी त्या पुस्तकाचा अनुवादही पूर्ण केला होता. परंतु ते पुस्तक माझ्या हाती आल्याचे पाहून मला किती आनंद झाला याचे वर्णन करणे अशक्य आहे.
कोणत्याही भाषेतील पुस्तकात गोव्यातील किनारे, मासे आणि माशांच्या विविध पाककृती यांवरील माहिती अशी एकत्र मिळणार नाही. किंबहुना अशा प्रकारचे लेखन वा पुस्तक अन्य कुठल्याही भाषेत असेल की नाही याविषयी मला शंकाच आहे. हे पुस्तक वाचताना पुन्हा पुन्हा माझ्या मनात विचार येत होते की, भोबेंनी जर हे पुस्तक कोंकणीत लिहून प्रकाशित केले असते तर अधिक चांगले झाले असते. या विचारातूनच मी या पुस्तकाचा कोंकणीत अनुवाद करण्याचे ठरवले. परंतु काही कारणांमुळे ते काम तसेच राहिले.
एके दिवशी माझ्या पुस्तकांचे कपाट लावताना अचानक गोपाळकृष्ण भोबे यांच्या ‘मासे आणि मी’ या पुस्तकाची छायाप्रत पुन्हा माझ्या हाती आली. या पुस्तकाचा अनुवाद कोंकणीत केला तर? असे वाटून घाबरत घाबरतच मी या पुस्तकाचा अनुवाद कराण्यास आरंभ केला. कारण यातील काही माहिती मला अगदी परिचयाची होती. अनुवाद करताना मी त्यात इतका गुंतून गेलो की परकाया प्रवेश करून मी मला लेखकाच्याच जागी पाहू लागलो.
या पुस्तकात ‘समुद्र आणि मी’, ‘तिसर्या’, ‘खुबे’, ‘कुर्ल्या’, ‘रांपण’ आणि ‘एकंदर’ असे पाच विस्तृत लेख आहेत. सागरकिनार्यावरील त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले जीवन, माशांचे विविध प्रकार, मासे पकडण्याची कला, इतकेच नव्हे तर यात माशांचे विविध पदार्थ बनविण्याचे तंत्रही सविस्तरपणे सांगितले आहे.
या पुस्तकात शेवटी भोबे म्हणतात, ‘माशांसंबंधी बोलताना असाच अनेकांशी वचनबद्ध झालो. जुन्या आठवणी सांगत गेलो. स्वयंपाकातले त्यांचे प्रकार धडाधडा सांगितले. आज सगळेच एकदम सांगावेसे वाटले. पण समुद्र अपरंपार आहे. त्याच्या पोटातल्या अगणित संपत्तीचा पारावार माझ्यासारख्या त्याचे वरवरचे दर्शन घेणार्याला कसा लागणार? इथे मी- म्हणजे जगप्रसिद्ध गणिती श्री. जयंतराव नारळीकरांच्या भाषेत सांगायचे झाल्यास- प्रचंड महासागर; त्या महासागरात डुचमळणारे एक गलबत; त्या गलबतात एक कोठी; त्या कोठीत एक लाकडी पिंप; आणि त्या पिंपाच्या कडेला चिकटलेला एक ढेंकूण. हा ढेकूण सागराचा शोध घेतोय! मी त्या ढेकणाहून लहान आहे!’
हे सर्व वाचल्यानंतर हे सर्व भोब्यांनीच कोंकणीत लिहिले असते तर ते अधिक चांगले झाले असते यात यत्किंचितही शंका नाही. याचे भान ठेवूनच मी एकामागोमाग एक असे सर्वच लेख अनुवादित केले आणि ‘जाग’ व ‘बिम्ब’ या नियतकालिकांतून प्रसिद्ध केले. अनेकांनी या अनुवादाची स्तुती केली. स्व. डॉ. सुरेशबाब आमोणकर यांनी तब्येत साथ देत नसतानाही मला पत्र पाठवून माझ्या प्रकाशित लेखांची त्यांनी स्तुती केली आणि मला त्यांनी स्वत: केलेल्या ‘मनाचे श्लोक’ या पुस्तकाचा अनुवादही पाठवून दिला. मुंबईचे श्री. मनोहरबाब धुंगट यांनी तर ‘जाग’मध्येच खास ‘पडसाद’ म्हणजेच प्रतिसाद लिहिला. त्यात मनोहरबाब लिहितात- ‘भोब्यांच्या गोष्टी कोंकणीतून अधिक रंगतात. मराठीत ते ‘मत्स्यपुराण’ होते. कोंकणीतून याच सांगितलेल्या माशांच्या खास गोष्टी मस्त आणि श्रवणीय होतात.’
लवकरच हा अनुवाद पुस्तकरूपाने केंद्रीय साहित्य अकादमीमार्फत प्रकाशित होईल. मत्स्यप्रेमी गोवेकरांना हे पुस्तक आवडेल यात शंका नाही; पण त्याचबरोबर मासे न खाणार्यांनाही हे पुस्तक खचितच आवडेल अशी खात्री आहे. स्व. गोपालकृष्ण भोबे यांच्या जन्मशताब्दी वर्षात हे पुस्तक प्रकाशित व्हावे ही समस्त गोवेकरांच्या वतीने त्यांना मी दिलेली श्रद्धांजलीच होईल.
अखेरीस गोपालकृष्ण भोबे यांना देवाज्ञा झाली तेव्हा गोमंतकातील प्रथितयश कवी र. वि. पंडित यांनी त्यांच्यावर लिहिलेली कोंकणी कविता उद्गृत करून माझ्या लिखाणाला पूर्णविराम देतो.
गोपालकृष्ण भोबे!
कसलें गा गीत
गायलें तुंवे
तारीच तोडीत
विणेच्यो!
कसली गा चीज
आयकली
प्रसाद वांटीत
जीणेचो!
भजन तुजें
रंगलें बेस
प्राण पडले
देवा पांयार!
आमी मात
नागवले
काळजां आमचीं
रगता- घायाळ!
- र. वि. पंडित