भूस्खलनातील मृतांची संख्या पोहोचली 177 वर

0
12

केरळच्या वायनाड जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या आता 177 वर पोहोचली आहे. त्यात 25 मुले आणि 70 महिलांचा समावेश आहे. तसेच जवळपास 200 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. काही वृत्तांमध्ये मृतांचा आकडा 276 पर्यंत पोहोचल्याचा दावाही करण्यात आला आहे; मात्र त्याला अधिकृतरित्या दुजोरा मिळू शकलेला नाही. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी काल वायनाड येथील दुर्घटनाग्रस्त भागाचा दौरा केला. त्यांनी बाधित लोकांशी संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी माध्यमांशी बोलत असताना राहुल गांधी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. माझ्या वडिलांचा ज्यावेळेस मृत्यू झाला होता, त्यावेळी मला जे दुःख झाले, तेच दुःख आज होत आहे. मी तर वडील गमावले होते; पण वायनाडमध्ये काहींनी संपूर्ण कुटुंब गमावले आहे, असे ते म्हणाले.