भूतानीला सांकवाळ पंचायतीची कारणे दाखवा नोटीस

0
6

>> सात दिवसांत कागपत्रे व ना हरकत दाखला देण्याचे निर्देश

संपूर्ण गोव्यात गाजत असलेला कुठ्ठाळी साकवाळ पंचायत क्षेत्रातील सावळफोंड गावात उभारण्यात येणाऱ्या, प्रमेश कस्ट्रक्शन, भूतानी इंफ्रा प्रकल्पाला अखेर साकवाळ पंचायतीने सर्व संमतीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सदर पंचायतीच्या झालेल्या बैठकीला ग्रामस्थांसोबतच गोव्यातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

भूतानी इंफ्रा प्रकल्पाला मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणाबरोबर आता साकवाळ पंचायतीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मंडळाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीला सात दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे आणि ना हरकत प्रमाणपत्रे सादर करण्यासह नियोजन आणि विकास प्राधिकरणच्या सर्व आवश्यकतांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

साकवाळ पंचायत क्षेत्रातील या प्रकल्पाला साकवाळ ग्रामस्थांबरोबर संपूर्ण गोव्यातून विरोध होत आहे. या प्रकल्पाला राज्य सरकारलासुद्धा विरोध करावा लागला होता. नंतर नगरविकासमंत्री विश्वजीत राणे यांनी मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणाला या प्रकल्पाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यास सांगितले होते. सांकवाळ सावळफोंड गावात उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाविरोधात सांकवाळचे पंच तथा दक्षिण गोवा भाजप अध्यक्ष तुळशीदास नाईक, पंच मॉव्हिलो कार्व्हालो, सिद्धी नाईक, मारिया पॉवलीना आझावेदो यांनी पूर्वीपासून विरोध दर्शविला होता. तसेच 11 मार्च 2024 रोजी झालेल्या पंचायतीच्या बैठकीतही तीव्र विरोध केला होता. मात्र नंतर सत्ताधारी पंच सदस्यांनी या प्रकल्पाला परवानगी दिली होती. परंतु सावळफोंड गावातील डोंगराळ भागात हा प्रकल्प उभारण्यासाठी संबंधित विभागाची मान्यता नसल्याचे माहिती हक्क कायद्याखाली मागविलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले होते.

दाखले नाहीत
सदर प्रकल्प उभारण्यासाठी विकासाचा उतारा नाही, समोच्च योजना नाही, तांत्रिक मंजुरी दस्ताऐवज नाही, पर्यावरण दाखला नाही, आरोग्य दाखला व सार्वजनिक बांधकाम विभागाबरोबर प्रकल्प उभारण्यासाठी पाहिजे असे दाखले नव्हते. सदर प्रकल्प उभारताना संबंधित कंपनीने निष्काळजीपणा केल्याचे उघड झाले आहे.

अखेर नाटीस
रविवार (दि. 22) रोजी प्रकल्पाविरोधात साकवाळ ग्रामस्थांबरोबर गोव्यातील विविध भागांतील सामाजिक कार्यकत्यांनी रॅली काढत या प्रकल्पाला विरोध दर्शविला होता. अकेर काल बुधवारी साकवाळ पंचायतीच्या बैठकीत उपस्थित सर्व पंच सदस्यांनी एकमताने या प्रकल्पाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
या बैठकीला सरपंच रोहिणी तोरस्कर, पंच अनुषा लमाणी, गिरीश पिल्ले, संतोष देसाई, डॅरिक वालिस, वॅलेटिनो रॉड्रिगीस, जसिया कादर, मारिया पॉवलिना आझावेदो, निधी नाईक, मॉव्हिलो काव्हालो, तुळसीदास दत्ता नाईक, ग्रामसेवक सचिव ओरविल वालिस व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत अनुचित प्रकार घडू नये म्हणून वेर्णा पोलीसही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते. बैठक सुरू होताच पंच तुळशीदास नाईक यांनी या प्रकल्पाला दिलेला परवाना मागे घेण्याची मागणी केली. यावेळी विरोध पंचांनीही प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला. या बैठकीत रामा काणकोणकर, शंकर पोळजी, ॲड. प्रतिमा कुतिन्हो व सांकवाळ भागातील ग्रामस्थ उपस्थित होते.