भावी पिढीसाठी सोहिरोबांच्या साहित्याचे जतन करणार

0
110
संत सोहिरोबानाथ आंबिये संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर. सोबत अरविंद जत्ती व इतर. (छाया : किशोर नाईक)

संत साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांची ग्वाही
आपल्याकडे संतांची थोर परंपरा आहे आणि या परंपरेतील संत सोहिरोबानाथ आंबिये हे गोव्याचे आहेत, याबद्दलचा अभिमान आणि आस्था अधिक आहे. त्यांनी रचलेल्या ओव्या, अभंग रचनांचे संकलन करून पुढच्या पिढीसाठी ठेवणे हे शासनाचे कर्तव्य ठरते. त्यांची एक ओवी जरी आपण आचरणात आणली तरी जीवनाचे कल्याण होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी येथे केले.राजभाषा संचालनालय आणि संत सोहिरोबानाथ आंबिये त्रिशताब्दी वर्ष समारोह समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कला अकादमीच्या मा. दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात आयोजित संत सोहिरोबानाथ आंबिये संत साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात काल मुख्यमंत्री पार्सेकर प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून बंगळुरू येथील संत साहित्याचे अभ्यासक अरविंद जत्ती, राजभाषा खात्याचे सचिव मॅथ्यू सॅम्युयल, कला संस्कृती खात्याचे सचिव फैझी ओ. हाश्मी व कला आणि संस्कृती संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर यांची उपस्थिती होती.
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे… हा दिव्य संदेश देणार्‍या सोहिरोबानाथांच्या त्रिशताब्दी निमित्त काही उपक्रम शासनाने वर्षभर राबविले. त्यात पेडणे शासकीय महाविद्यालयाचे संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालय असे नामकरण, भक्ती संगीत संमेलन, ग्रंथोत्सव, गोवा विद्यापीठात त्यांच्या नावे अध्यासन आदी उपक्रमांचा समावेश होता असे स्पष्ट करून मुख्यमंत्री पार्सेकर यांनी गोवा विद्यापीठाकडे जाणार्‍या चौपदरी मार्गाला त्यांचे नाव देण्यात येईल अशी घोषणा केली. त्यांचे साहित्य सर्वत्र पोचण्यासाठी इंग्रजी गौरव ग्रंथाचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
अरविंद जत्ती यांनी सांगितले की भारतीय नैतिक मूल्यांची जी घसरण झालेली दिसते त्यावर आध्यात्मिकता हाच उपाय आहे. गोवा हे मौजमजेचे केंद्र नसून दैवी पुण्यभूमी आहे, हे चित्र समोर यायला हवे. कारण ही संत सोहिरोबानाथांची भूमी आहे. अध्यात्मिकता हा इथल्या पर्यटनाचा भाग बनला पाहिजे. आपले खरे तत्वज्ञान सोहिरोबानाथांच्या वचनात आहे. ङ्गस्वच्छ भारतफ ची कल्पना आंतर्बाह्य जाणवली पाहिजे, जी संतांना अभिप्रेत होती. सत्व, रजो, तमो गुणांच्या आध्यात्मिक अनुभूती त्यांनी उद्धृत करून कर्नाटक सरकारने संतांच्या ११७ वचनांचा २३ भाषांमध्ये अनुवाद केला आहे. तसा सोहिरोबानाथांच्या वचनांचा करावा अशी सूचना केली. त्यांनी सदर प्रत मुख्यमंत्र्यांना भेट देऊन शाल, हार व डोक्यावर पगडी घालून त्यांचा सत्कार केला.
मॅथ्यू सॅम्युअल यांनी प्रास्ताविक केले. फैझी हाश्मी यांचे भाषण झाले. राजभाषा संचालनालयाचे संचालक डॉ. प्रकाश वजरीकर यांनी आभार मानले. मैथिली ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. उद्घाटनानंतर ङ्गअंतरीचा ज्ञान दिवाफ हा संत सोहिरोबानाथांचे जीवन दर्शन घडविणारा सुरेख कार्यक्रम अभंग, नाट्य, नृत्याच्या माध्यमातून सादर करण्यात आला. नीलेश महाले यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. संमेलनापूर्वी टाळ-मृदंगाच्या गजरात कांपाल येथील महावीर उद्यानाकडून दिंडी काढण्यात आली. तीत महिला तरुण-तरुणींचा सहभाग होता.