भारतीय फुटबॉल संघाने हल्ली केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर फिफाच्या जागतिक क्रमवारीत ९९व्या स्थान मिळविले आहे. गेल्या वर्षभारात दुसर्यांदा भारतीय संघ अव्वल १०० संघात स्थान मिळविण्यात यशस्वी झाला आहे.
भारतीय संघाने तीन स्थानांची झेप घेत हे यश मिळविले आहे. गेल्या महिन्यापर्यंत भारतीय संघ १०२व्या स्थानावर होता. परंतु ६ गुण मिळवित त्यांनी तीन स्थानांची झेप घेतली. भारताची आता एकूण ३३९ गुण झाले आहेत. एएफसी चषक पात्रता २०१९ स्पर्धेत शानदार कामगिरी केलेला भारतीय संघ लिबियासह संयुक्त ९९व्या स्थानी आहे. भारतीय संघ आपला पुढचा सामना २७ मार्च रोजी किर्गीज प्रजासत्ताक संघाविरुद्ध बिस्केकमध्ये खेळणार आहेे.
भारतीय संघाने एएफसी चषकासाठी यापूर्वीच पात्रता मिळविलेली आहे. परंतु किर्गीज प्रजासत्ताकविरुद्ध होणार्या पात्रता फेरीतील सामन्यात विजय मिळवित आपल्या रँकिंगमध्ये सुधारणा करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. भारताने यापूर्वी १९९६मध्ये फिफा क्रमवारीत ९४वे स्थान मिळविले होते. ही त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम क्रमवारी आहे. त्यानंतर ते स्टीफन कॉन्स्टेनटाईनच्या मार्गदर्शनाखाली २१०७साली ९६व्या स्थानापर्यंत पोहोचले होते. परंतु त्यानंतर ते आपले स्थान कायम राखण्यात अपयशी ठरले होते.
एशियाई फुटबॉल कॉन्फेडरेश (एएफसी) देशांच्या रँकिंगमध्ये भारतीय संघ १३व्या स्थानावर पोहोचला आहे.
जागतिक क्रमवारीत जर्मनी प्रथम, ब्राझील दुसर्या, पोर्तुगाल तिसर्या, अर्जेंटिना चौथ्या तर बेल्जियम पाचव्या स्थानी आहे.