
>> अजिंक्य रहाणे, अश्विनकडून निराशा
भारत व श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसर्या दिवशीदेखील पावसाने अधिराज्य गाजवले. त्यामुळे केवळ २१ षटकांचा खेळ होऊ शकला. पहिल्या दिवसअखेर ३ बाद १७ अशा केविलवाण्या स्थितीत असलेल्या भारतीय संघाने दुसर्या दिवसअखेर ५ बाद ७४ धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत खेळपट्टी थोडीशी मंदावली असून फलंदाजी करणे तुलनेने सोपे झाले आहे. शेवटच्या १० षटकांत ३३ धावा जमवून भारतीय फलंदाजांनी हे दाखवून दिले आहे. श्रीलंकेचे गोलंदाज बळी मिळविण्यासाठी सातत्याने दबाव टाकत असताना चेतेश्वर पुजाराने हा दबाव झुगारत ४७ धावांपर्यंत मजल मारली आहे. वृध्दिमान साहा ६ धावा करून त्याला साथ देत आहे.
पहिल्या दिवसाच्या ३ बाद १७ धावांवरून पुढे खेळताना काल भारताला अजिंक्य रहाणेकडून खूप अपेक्षा होत्या. कसोटी स्पेशलिस्ट म्हणून संघात असलेल्या रहाणेने मात्र निराशा केली. मध्यमगती गोलंदाजी करणारा अष्टपैलू दासुन शनका याच्या ऑफस्टंपबाहेर चेंडूवर ‘ड्राईव्ह’चा फटका खेळण्याच्या नादात यष्टिरक्षक डिकवेलाकडे झेल देऊन तो माघारी परतला. रहाणेच्या पतनानंतर अश्विनला सहाव्या स्थानी बढती देण्यात आली. अश्विनची नजर खिळलेली असताना मध्यमगती गोलंदाज गमागेचा एक उसळता चेंडू अश्विनच्या उजव्या हाताच्या बोटांवर बसला. यामुळे एकाग्रता भंगलेल्या अश्विनने खेळपट्टीवर टिकून राहण्याची तसदी न घेता ऑफ स्टंपच्या खूप बाहेर असलेल्या चेंडूशी छेडछाड करण्याच्या प्रयत्नात स्लीपमध्ये करुणारत्नेकडे झेल देऊन तंबूची वाट धरली. भारतीय संघाने किमान १५० धावांपर्यंत जरी मजल मारली तरी सामना रंगतदार होण्याची शक्यता असून तिसर्या दिवसाचे पहिले सत्र सामन्याची दिशा ठरवणारे असेल.
धावफलक
भारत पहिला डाव (३ बाद १७ वरून) ः चेतेश्वर पुजारा नाबाद ४७, अजिंक्य रहाणे झे. डिकवेला गो. शनका ४, रविचंद्रन अश्विन झे. करुणारत्ने गो. शनका ४, वृध्दिमान साहा नाबाद ६, अवांतर ५, एकूण ३२.५ षटकांत ५ बाद ७४
गोलंदाजी ः सुरंगा लकमल ११-९-५-३, लाहिरु गमागे ११.५-३-२४-०, दासुन शनका ८-२-२३-२, दिमुथ करुणारत्ने २-०-१७-०