>> श्रीलंकेचा 302 धावांनी पराभव
>> महंमद शमीचे स्पर्धेत दुसऱ्यांदा पाच बळी
सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत काल गुरूवारी वानखेडे मैदानावर भारताने श्रीलंकेचा तब्बल 302 धावांनी पराभव केला. भारताचे एकूण 14 गुण झाले. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिल्यानंतर भारतीय संघाने 50 षटकात 8 बाद 358 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना श्रीलंकेचा डाव अवघ्याा 55 धावात गुंडाळत भारताने हा सामना 302 धावांनी जिंकला. भारताकडून जलदगती गोलंदाज महंमद शमीने 5 षटकात 18 धावा देत 5 बळी घेतले. महंमद सिराजने 7 षटकांत 16 धावा देत 3 तर जसप्रीत बुमराहने 5 षटकात 8 धावा देत 1 बळी मिळविला. तर श्रीलंकेचा शेवटचा बळी डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने घेतला. श्रीलंकेच्या महंमद शमी याने विश्वचषकात दुसऱ्यांदा पाच बळी टिपण्याचा कारनामा केला आहे. शमीने यंदाच्या विश्वचषकातील तीन सामन्यांत 14 बळी टिपले आहेत.
भारताने सलग सात सामन्यात विजय मिळवताना गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात सर्वस्वी योगदान दिले. सांघिक खेळाच्या बळावर टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.
काल भारतातर्फे फलंदाजीत सलामीवीर शुभमन गिल (92), विराट कोहली (88) व श्रेयस अय्यर (82) यांनी दमदार फलंदाजी केली. मात्र तिघांनाही शतक पूर्ण करता आले नाही. श्रीलंकेच्या दिलशान मधुशंकाने 5 गडी बाद केले. (संबंधित वृत्त क्रीडापानावर)
एकदिवसीय विश्वचषकात महंम्मद शमी भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. माजी दिग्गज वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ आणि झहीर खान यांना मागे टाकून त्याने हा ऐतिहासिक विक्रम केला. शमीने स्पर्धेतील 14व्या डावात 45 बळी घेतले आहेत. अनुभवी जवागल श्रीनाथ आणि झहीर खान यांनी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताकडून प्रत्येकी 44 बळी घेतले आहेत