पहिल्या लढतीत भारताने ऑस्ट्रेलियासारख्या भक्कम फलंदाजी फळी लाभलेल्या संघाविरुद्ध १३२ धावांचा यशस्वी बचाव केला होता. गोलंदाजीत पूनम यादव व शिखा पांडे यांनी भेदक मारा करत आपली उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध केली होती. शफालीचा आक्रमकता, जेमिमाचा संयम व दीप्तीच्या समयोचितपणाचे दर्शन या सामन्यात भारतीय क्रीडा रसिकांना घडले होते. वाकाची खेळपट्टी उभय संघांसाठी नवीन असल्याने या खेळपट्टीशी जुळवून घेण्याची कसरत दोन्ही संघांना सर्वप्रथम करावी लागेल. २०१८च्या आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत बांगलादेशने भारताचा पराभव करत सनसनाटी निकालाची नोंद केली होती. जिव्हारी लागणारा हा पराभव टीम इंडिया अजून विसरलेली नाही. त्यामुळे नव्या जोमात भारतीय संघ बांगलादेशवर तुटून पडणे अपेक्षित आहे. २०१६च्या विश्वचषकात फहिमा खातून हिने टीम इंडियाची सलामीवीर स्मृती मंधाना हिला भोपळाही न फोडता तंबूची वाट दाखवली होती. हे अपयश मागे सारून मोठी धावसंख्या उभारण्याचा मंधानाचा आज प्रयत्न असेल. शफाली वर्मा, दीप्ती, हरमनप्रीत व जेमिमाकडूनही खूप अपेक्षा आहेत. बांगलादेश संघाचा विचार केल्यास जहानारा आलाम ही त्यांची जलदगती गोलंदाज वाकाच्या वेगवान खेळपट्टीचा फायदा उठवू शकते. त्यामुळे भारतीय फलंदाजांना आपली रणनीती आखताना सर्व बाबींचा विचार करावा लागणार आहे.