
>> सामन्यावर पावसाचे सावट
>> कुलदीपला मिळू शकते संधी
भारत व न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना आज ग्रीनफिल्ड मैदानावर खेळविला जाणार आहे. भारतीय भूमीवर क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात दोन किंवा जास्त सामन्यांचा समावेश असलेली मालिका जिंकण्याच्या उंबरठ्यावर न्यूझीलंडचा संघ असून त्यांना रोखण्यासाठी टीम इंडियाने कंबर कसली आहे.
भारताने शेवटच्या वेळी या मैदानावर सामना खेळला होता. त्यावेळी विराट कोहलीचा जन्मदेखील झाला नव्हता. सध्या टीम इंडियाचा प्रशिक्षक असलेल्या रवि शास्त्री याच्या नेतृत्वाखाली भारताला त्यावेळी विंडीजकडून ९ गड्यांनी सपाटून मार खावा लागला होता. २०१२ साली विशाापट्टणममधील सामना पावसामुळे रद्द करावा लागल्यानंतर किवीज संघाने चेन्नईतील एकमेव सामना एका धावेने जिंकला होता. त्यामुळे मालिका विजयाचे सुख त्यांना लाभले नव्हते. यावेळीसुद्धा शेवटच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. परतीचा पाऊस सामन्यात अडथळा आणण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. २०१२ साली चेन्नईतील त्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीला शेवटच्या षटकात १३ धावा करता आल्या नव्हत्या. त्यावेळी धोनी आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर होता. त्यावेळी धोनीने निराश केले होते.
राजकोटमध्ये ६५ चेंडूंत १३० धावांची गरज असताना धोनीने २६ चेंडूंत २६ धावा केल्या. यानंतर सामना हातचा निसटल्यानंतर काही आक्रमक फटके खेळून टी-२०ला साजेशा ३७ चेंडूंत ४९ धावा केल्या. त्यामुळे आज त्याच्यावर दबाव असेल. दिल्ली येथे झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने तीन झेल सोडले होते. याची किंमत त्यांना टी-२० क्रमवारीतील आपले अव्वल स्थान गमावून मोजावी लागली होती. दुसर्या सामन्यात भारताने कहर करताना चार झेल सोडताना कॉलिन मन्रोच्या शतकाला हातभार लावण्याचे काम केले. यामुळे मालिका खिशात घालण्याची सुवर्णसंधी मिळूनही दारुण पराभव भारताच्या पदरी आला होता. राजकोटमध्ये भुवनेश्वर व बुमराह यांच्या ८ षटकांत ५२ तर पदार्पणवीर सिराजच्या ४ षटकांत ५३ धावा आल्या होत्या. त्यामुळे सिराजच्या जागेवर चायनामन कुलदीप यादवला संधी मिळू शकते. दिल्लीत कडाक्याच्या थंडीचा सामना केल्यानंतर पाहुण्या संघाला राजकोटमध्ये कोरड्या उष्म्याचा सामना करावा लागला होता. तिरुअनंतपुरममधील परिस्थिती या दोहोंपेक्षा पूर्णपणे वेगळी असून जवळपास १०० टक्के आर्द्रतेची शक्यता असल्याने किवीज तसेच भारतीय खेळाडूंना ‘क्रॅम्प’चा त्रास होऊ शकतो.
भारत (संभाव्य) ः रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, महेंद्रसिंग धोनी, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह व युजवेंद्र चहल.
न्यूझीलंड (संभाव्य) ः कॉलिन मन्रो, मार्टिन गप्टिल, केन विल्यमसन, टॉम ब्रूस, ग्लेन फिलिप्स, हेन्री निकोल्स, कॉलिन डी ग्रँडहोम, मिचेल सेंटनर, ईश सोधी, ऍडम मिल्ने व ट्रेंट बोल्ट.