भारत-द. कोरिया लढत बरोबरीत

0
85

स्ट्रायकर गुरजंत सिंहने सामन्याच्या अंतिम मिनिटाला नोंदविलेल्या गोलाच्या जोरावर भारताने बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या सुपर ४ टप्प्यातील आपल्या पहिल्या सामन्यात काल दक्षिण कोरियाला १-१ असे बरोबरीत रोखत गुण विभागून घेतले.

गट फेरीतील सामन्यांमध्ये आकर्षक कामगिरी केलेल्या भारतीय संघाला काल दक्षिण कोरियन संघाने बरेच झुंजविले. पहिले दोन क्वॉर्टर गोलशून्य गेल्यानंतर तिसर्‍या क्वॉर्टरमध्ये ४१व्या मिनिटाला कोरियाने आपले खाते खोलले. ली जुंगजुनने चेंडू गोलरक्षकाच्या वरून थेट गोलपोस्टमध्ये पाठवित कोरियाला आघाडीवर नेणारा हा गोल नोंदविला. स्पर्धेत भारतीय संघाला पहिला पराभव स्वीकारावा लागणार असे वाटत असताना सामन्याच्या अंतिम क्षणात संघाने कोरियन बचाव भेदण्यात यश मिळविले आणि शेवटच्या मिनिटाला गुरजंत सिंगने संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली.

भारतीय संघाचा सुपर ४ टप्प्यातील पुढील सामना आज सायं. ५ वा. मलेशियाविरुद्ध होणार आहे. मलेशियाने काल पाकिस्तानवर ३-२ अशी मात केली होती.