भारत आता करणार शुक्रावर स्वारी

0
10

>> शुक्रयान मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळाने काल शुक्रयान (व्हिनस ऑर्बिटर मिशन) मोहिमेला मंजुरी दिली. चांद्रयान आणि मंगळयान या मोहिमानंतर आता भारत शुक्रावर स्वारी करणार आहे. शुक्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा असलेला ग्रह आहे. या मोहिमेद्वारे शुक्र या ग्रहाचा अभ्यास केला जाणार आहे.

शुक्रयान मोहिमेसाठी एक खास अंतराळयान तयार केले जाईल. हे अंतराळयान शुक्राच्या कक्षेत फिरुन त्याचा अभ्यास करणार आहे. शुक्र ग्रहावर काय स्थिती आहे. त्याचे चंद्र कुठले? सूर्याचा शुक्रावर कसा प्रभाव पडतो? याचा अभ्यास केला जाणार आहे. शुक्र हा मानवी वस्तीसाठी योग्य असा ग्रह होता, असे सांगितले जाते; मात्र नंतर इथली स्थिती बदलली. ती कशी बदलली त्याचाही अभ्यास या मोहिमेत केला जाणार आहे.

मोहिमेसाठी 1236 कोटींचा निधी मंजूर
शुक्रयान मोहिमेसाठीचे अंतराळयान तयार करणे आणि ते प्रक्षेपित करणे याची जबाबदारी इस्रोची असणार आहे. ही मोहीम 2028 मध्ये प्रत्यक्षात येईल. या योजनेसाठी 1236 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शुक्रयान अंतराळयानासाठी त्यातील 824 कोटी रुपये खर्च होणार आहेत.

शुक्रयानाची वैशिष्ट्‌‍ये काय असतील?
शुक्रयानाचे वजन 2500 किलो असणार आहे. त्यामध्ये 100 किलोंचे पेलोड्स असतील. या शुक्रयानात जर्मनी, स्वीडन, फ्रान्स, रशिया यांचेही पेलोड्स असण्याची शक्यता आहे. या शुक्रयानाचे आयुष्य चार वर्षांचे असेल. शुक्रयान अंतराळात गेल्यानंतर शुक्र ग्रहाची संरचना, ज्वालामुखीचे प्रमाण तिथे आहे का? शुक्राच्या पृष्ठभागावर असलेला वायू, त्याचे उत्सर्जन, हवेची गती, ढगांची गती या सगळ्याचा अभ्यास करणार आहे.