भारत-अमेरिका संबंध आता अधिक दृढ ः मोदी

0
101

अमेरिकेच्या तीन दिवसांच्या महत्त्वाच्या दौर्‍यावर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे दाखल झाले. येथील व्हाईट हाऊसमध्ये त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मोदी यांनी उभय देश यापुढेही एकत्रितपणे कार्यरत राहतील असे प्रतिपादन केले. भारत व अमेरिका खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचा अभिमान वाटत असल्याचेही ते म्हणाले. दोन्ही देशांदरम्यानचे संबंध आता दृढ बनल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

२०१४ पासून मोदी यांचा हा चौथा अमेरिका दौरा आहे. या दौर्‍या दरम्यान ते अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याबरोबर चर्चा करून उभय देशांदरम्यानच्या द्विपक्षीय संबंधाचा आढावा घेणार आहेत. ओबामा यांच्या निमंत्रणावरून मोदी येथे दाखल झाले आहेत. हा दौरा संपवल्यानंतर ते मेक्सिकोला जाणार आहेत. मोदी यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो. भारताच्या अत्यंत प्राचीन अशा अतीमौल्यवान मूर्ती व वस्तू भारताला परत करण्याच्या प्रक्रियेलाही मोदी यांच्या या
अमेरिका भेटीने प्रारंभ झाला आहे. मोदी यांच्या उपस्थितीत जैन मूर्ती, ब्रॉंझच्या गणेश मूर्ती भारताला परत करण्यात आल्या. अशा सुमारे २० मूर्ती भारताला पुन्हा दिल्या जाणार आहेत.
मोदी-ओबामा यांची आता झालेली ही सहावी भेट आहे. या भरगच्च दौर्‍या दरम्यान अमेरिकी संसदेत भाषण करणारे मोदी भारताचे पाचवे पंतप्रधान ठरणार आहेत. स्वीत्झर्लंड दौरा आटोपून मोदी वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले आहेत. स्वीस दौर्‍यात त्यांनी अणु पुरवठादार सदस्य देशांच्या गटासाठी स्वीत्झर्लंडचा पाठिंबा मिळवला आहे.
कल्पना चावलाला श्रद्धांजली
या अमेरिका दौर्‍याचा प्रारंभ मोदी यांनी भारतीय वंशाची अंतराळवीर कल्पना चावला हिला श्रद्धांजली अर्पण करून केला. त्यांच्या स्वागतासाठी अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा, भारताचे अमेरिकेतील राजदूत अरुण सिंग, विदेश सचिव एस. जयशंकर, अमेरिकेचे विदेश सचिव ऍश्टन कार्टर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी अवकाश संशोधक सुनिता
विल्यम्स व त्यांचे वडील उपस्थित होते. त्यांच्याशी मोदी यांनी संवाद साधला. सुनिता विल्यम्सच्या वडिलांशी मोदी गुजरातीत बोलले व त्यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले.