भारतीय 80 मच्छिमारांची पाकिस्तानमधून सुटका

0
23

पाकिस्तानमधून 80 भारतीय मच्छिमारांची सुटका करण्यात आली आहे. कराचीच्या तुरुंगातून सुटका झालेले हे 80 मच्छिमार रविवारी रेल्वेने गुजरातमधील बडोदा येथे पोहोचले. बडोद्यातून या मच्छिमारांना दिवाळीदिवसी आपल्या कुटुंबीयांशी भेट घालून देण्यासाठी बसमधून गिर सोमनाथ जिल्ह्यातील वेरावल येथे नेण्यात आले. या मच्छिमारांची पाकिस्तानकडून गुरुवारी सुटका करण्यात आली होती. त्यानंतर पंजाबमधील अटारी-वाघा सरहद्दीवर गुजरातच्या मत्स्यपालन विभागाच्या एका टीमकडे सोपवण्यात आले होते.
2020 मध्ये मासे पडकण्यासाठी हे मच्छिमार गेले असताना ते भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. तिथे पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना पकडले होते. सुटका करण्यात आलेल्या 80 मच्छिमारांमधील 59 मच्छिमार गिर सोमनाथ जिल्हातील, 15 देवभूमी द्वारका येथील, 2 जामनगर आणि एक अमरेली येथील आहेत. तर तीन मच्छिमार हे दीव येथील आहेत. अजून 200 मच्छिमार हे पाकिस्तानमधील विविध तुरुंगामध्ये कैदेत आहेत. सुटका झालेल्या मच्छिमारांना त्यांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करता येणार आहे.
दरम्यान, यावर्षी मे आणि जून महिन्यामध्ये पाकिस्तानच्या सरकारने सुमारे 400 भारतीय मच्छिमारांची सुटका केली होती.