भारतीय मुस्लिमांचे देशप्रेम वादातीत : मोदी

0
108

भारतीय मुस्लिमांचे देशप्रेम वादातीत असून ते देशासाठी जगतील व मरतील आणि ते अल कायदामागे कधीच जाणार नाहीत, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला. गेल्या काही दिवसांत भाजपच्या मुस्लिमविरोधी विधानांनंतर पंतप्रधानांनी हे वक्तव्य केले आहे.
अल कायदाचे नेते अल जवाहिरी यांनी भारतात शाखा उघडण्याची घोषणा केली होती त्यासंदर्भात मोदी म्हणाले की, अल कायदाला जर वाटत असेल की भारतीय मुस्लिम त्यांच्या मागे जातील तर तो त्यांचा केवळ भ्रम आहे.
दरम्यान, पंतप्रधान बनल्यानंतरच्या पहिल्या मुलाखतीत मोदी यांनी पुढे सांगितले की, आपण दहशतवादाची मानसशास्त्रीय व धार्मिक अंगाने चिकित्सा करू इच्छित नाही. दहशतवाद हा एकुणच मानवतेला धोका आहे इतके मात्र नक्की. त्यामुळे या धोक्यातून मानवतेला कसे वाचवता येईल हे पाहणे जास्त महत्त्वाचे वाटते असे मोदी म्हणाले. मोदींच्या अमेरिका भेटीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील सीएनएन वाहिनीने ही मुलाखत घेतली आहे. ती २१ रोजी आयबीएन वाहिनीवरूनही प्रसारित होणार आहे.