भारतीय पत्रकारिता मुक्त व सक्षम

0
123

पत्रकार पुरस्कार वितरण समारंभात प्रभू चावला यांचे प्रतिपादन
अन्य कोणत्याही देशापेक्षा भारतीय पत्रकारिता मुक्त व सक्षम आहे. ती अशीच टिकून रहावी यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक आहे. भारतातील प्रसार माध्यमे जर कमजोर बनली तर राजकीय नेत्यांना रान मोकळे मिळेल व देशात अनाचार माजेल, अशी भीती इंडिया टुडेचे संपादक प्रभू चावला यांनी काल येथे बोलताना व्यक्त केली.
गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी प्रभू चावला यांच्या हस्ते सहा पत्रकारांचा पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ते म्हणाले की भारतातील लोकांना बर्‍याचशा गोष्टींसाठी पत्रकारांना दोष द्यायची सवय आहे. राजकीय नेते भ्रष्टाचार करायला लागले की लोक पत्रकार काय करीत आहेत असा सवाल करतात असे चावला म्हणाले. मात्र, पुन्हा पुन्हा त्याच भ्रष्टाचारी नेत्यांना लोकच निवडून आणीत असतात असे त्यांनी सांगितले.
पत्रकारितेत स्पर्धा वाढली
सध्या पत्रकारितेत स्पर्धा वाढलेली आहे. सर्वांत प्रथम बातमी देण्याच्या नादात आपण देतोय ती बातमी कितपत खरी आहे याचे भान ठेवले जात नाही. अर्धवट माहितीच्या आधारे बातमी दिली जाते. दृकश्राव्य माध्यमे तर बातमी द्यायची सोडून मते-मतांतरे व्यक्त करण्यावरच वेळ वाया घालवत असतात. मात्र, तसे असले तरी टीव्ही माध्यम हे एक प्रभावी माध्यम आहे हेही तेवढेच खरे असल्याचे ते म्हणाले. टी. व्ही माध्यमासाठी काम करणार्‍या पत्रकारांनी तावातावाने बोलणे, हावभाव करणे व चांगले कपडे घालून आकर्षण दिसणे या गोष्टींपेक्षा चांगले वृत्तांकन करण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्ती केली. वृत्त वाहिन्यांना आपली बातमी कशी विकली जाईल याचीच चिंता व घाई असते असे सांगून ही चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले. पत्रकारांनी विश्वसार्हता टिकवून ठेवायला हवी असे ते म्हणाले.
प्रादेशिक वृत्तपत्रांनी राष्ट्रीय वृत्तपत्रांचे अनुकरण करू नये
प्रादेशिक वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या यानी राष्ट्रीय वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रे यांचे अनुकरण न करता स्वत:ची पत्रकारिता करायला हवी. प्रादेशिक वृत्तपत्रे ही राष्ट्रीय वृत्तपत्रांपेक्षा शक्तीशाली आहेत. कित्येक घोटाळे प्रादेशिक वृत्तपत्रांनी उघड केलेले असून अंतुले यांनी केलेला सिमेंट घोटाळा सुद्धा प्रादेशिक वृत्तपत्रानेच उघड केला होता याची त्यानी आठवण करून दिली. प्रादेशिक वृत्तपत्रानी आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. पत्रकारिता ही लोकमान्य असायला हवी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. निवृत्तीनंतर पत्रकारांची स्थिती निवृत्ती पेन्शन अभावी हलाखीची होते हे सत्य असले तरी पत्रकारांनी पेन्शनसाठी स्वत:ला राजकारण्यांपुढे गहाण ठेवता कामा नये. त्यासाठी पत्रकारांनी सर्वांनी मिळून वेगळी व्यवस्था करायला हवी अशी सूचना त्यानी केली.
यावेळी भारतीय भाषांतील उत्कृष्ट पत्रकारासाठी असलेला पुरस्कार लोकमतचे सद्गुरु पाटील, इंग्रजी पत्रकारासाठी असलेला पुरस्कार मायाभूषण नागवेंकर, इलेक्ट्रॉनिक मिडियासाठी असलेला पुरस्कार अनिल लाड (इन गोवा), उत्कृष्ट संपादकासाठी असलेला पुरस्कार विनायक नाईक (गोवा टुडे), उत्कृष्ट न्यूज रूम पत्रकारासाठी असलेला पुरस्कार देविका सिक्वेरा व गुरुदास सिंगबाळ यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मानचिन्ह व १० हजार रु. असे या पुरस्काराचे स्वरूप होते.