पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून नेपाळ दौर्‍यावर

0
117

नेपाळबरोबरील एक नवा अध्याय सुरू करणार्‍या दौर्‍यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या देशात दाखल होणार आहेत. नेपाळच्या विकासाला पाठिंबा देण्याचे भारताचे प्रयत्न चालूच राहतील यासाठी मोदी यानी वचनबध्दताही व्यक्त केली आहे. नेपाळच्या निमंत्रणावरून मोदी दोन दिवसांच्या दौर्‍यावर दाखल होणार आहेत.
भारतीय उपखंडातील एका शेजारी राष्ट्राबरोबरील आदर्श ठरणार्‍या एका नव्या अध्यायाची सुरुवात नेपाळ भेटीने होईल याची ग्वाही मोदी यांनी दिली आहे. या अनुषंगाने आपण उत्साहीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
नेपाळशी एक नवे नाते निर्माण करण्याच्या अनुषंगाने नेपाळी नेतृत्वाला भेटण्यासाठी आपण वाट पाहत असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
व्यापार व गुंतवणूक, जल उर्जा, कृषी, कृषी प्रक्रिया, पर्यावरण, पर्यटन, शिक्षण, संस्कृती व क्रीडा यासह महत्वाच्या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्याचे वातावरण तयार करण्यावर या दौर्‍यादरम्यान भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
आपल्या या दौर्‍यावेळी मोदी नेपाळचे पंतप्रधान सुशील कोयराला यांच्याशी चर्चा करणार आहेत. तेथील उद्योजकांशीही ते संवाद साधणार आहेत.