
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने ३ बाद १७ धावा केल्या आहेत. तुरळक पाऊस व यानंतर अंधुक प्रकाशामुळे दिवसभरात केवळ ११.५ षटकांचा खेळ झाला. द. आफ्रिका दौर्यासाठी तयारी करण्याच्या उद्देशाने खेळपट्टीवर ठेवण्यात आलेल्या गवताचा पुरेपूर फायदा उठवत श्रीलंकेने भारताची तीन गडी माघारी पाठवले. सुरंगा लकमलने ६ षटकांत एकही धाव न देता भारताचे तिन्ही गडी बाद केले.
श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंदीमलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. २००६ सालानंतर केवळ तिसर्यांदा नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ईडन गार्डनवर तर तीस वर्षांपूर्वी पाकिस्तानने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली होती. कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवताना सुरंगा लकमल याने डावातील पहिल्याच चेंडूवर लोकेश राहुलला यष्टिरक्षक निरोशन डिकवेलाकरवी झेलबाद केले. २००७ साली बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत वासिम जाफर मश्रफी मोर्तझाच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. यानंतर तब्बल दशकभरानंतर दुसरा भारतीय खेळाडू पहिल्या चेंडूवर बाद होण्याची घटना काल घडली. तिसर्या स्थानावर आलेल्या चेतेश्वर पुजाराने दोन-तीनवेळा बाद होता होता थोडक्यात बचावला. २२व्या चेंडूवर त्याने आपले खाते खोलले. शिखर धवन (८) जम बसत असताना त्रिफळाचित झाला तर कोहलीला सुरंगाने खातेही खोलू दिले नाही.
धावफलक
भारत पहिला डाव ः लोकेश राहुल झे. डिकवेला गो. लकमल ०, शिखर धवन त्रि गो. लकमल ८, विराट कोहली पायचीत गो. लकमल ०, अजिंक्य रहाणे नाबाद ०, अवांतर १, एकूण ११.५ षटकांत ३ बाद १७
गोलंदाजी ः सुरंगा लकमल ६-६-०-३, लाहिरु गमागे ५.५-१-१६-०